"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
ग्रामविकास प्रणेते, भारतरत्न नानाजी देशमुख. नवदधीचि नानाजी देशमुख. चित्रकूटचे शिल्पकार नानाजी. नानाजींचा जन्म महाराष्ट्रातला, पण त्यांची कर्मभूमी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश. न कळत्या वयात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जायला लागले. नंतर त्यांनी जनसंघ, जनता दल, व भारतीय जनता पार्टी यांच्या निर्मितीमध्ये मोठा सहभाग घेतला. वयाच्या साठाव्या वर्षी राजकारणातून निवृत्त होऊन त्यांनी समाजकार्याचे असिधाराव्रत स्वीकारले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर पगडा होता व त्याला अनुसरूनच त्यांनी गोंडा प्रकल्प, बीड प्रकल्प व चित्रकूट प्रकल्प असे तीन प्रकल्प साकारले. नानाजी आदर्श राष्ट्रपुरुष होते. त्याग, सेवावृत्ती, देशभक्ती, राष्ट्रप्रेम अशा अनेक गुणांचा मिलाप त्यांच्या ठायी होता. त्यांचे व्यक्तिमत्व एखाद्या ऋषीप्रमाणे होते. रोखठोक विचारांचे, जातपात न मानणारे, भेदभाव न करणारे, असे नानाजी. त्यांना समाज सुधारण्याची आस होती. सामाजिक कार्याची व सतत नवीन काहीतरी करण्याची त्यांची उर्मी होती. नानाजी म्हणजे चैतन्याचा झरा! वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी चित्रकूट हा प्रकल्प हाती घेतला. ते एक कर्मयोगी होते.
नानाजींच्या आयुष्याचे चार कालखंड आहेत. पहिला त्यांच्या जन्मापासून शिक्षणाचा काळ (साधारणपणे १९१६ ते १९३६ , दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून उत्तर प्रदेशात काम केले तो (१९३७ ते १९५०), तिसरा कालखंड राजकारणात भाग घेतला तो (१९५१ ते १९७८). या कालावधीत नानाजींचे संघटना संघटन कौशल्य, व नेतृत्व गुण दिसून आले. चौथा शेवटचा टप्पा राजकारणातून निवृत्ती घेऊन ते समाजाच्या सेवेसाठी गोंडा व चित्रकूट येथे गेले. वयाच्या ९४ व्या वर्षापर्यंत ते समाजाच्या कल्याणासाठी झटत होते (१९७९ ते २०१०).
त्यांच्या बालपणाची सुरुवात चांगली झाली नाही. आईचे छत्र ते अवघ्या दीड वर्षाचे असताना हरपले. मग वडील निधन पावले. एका अर्थी आईवडिलांचे प्रेमळ छत्रवात्सल्य त्यांना मिळालेच नाही. आज एका बहिणीकडे, तर काही वर्षांनी दुसऱ्या बहिणीकडे व शेवटी मामांकडे असे ते शिक्षणासाठी हिंडत राहिले. पण याच कालावधीत त्यांची ओळख 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'शी झाली व कर्तबगार प्रेमळ पितृतुल्य डॉक्टर हेडगेवार यांनी नानाजींना हाताशी धरून पुढे चालवले. पण डॉक्टरांचा सहवासही नानाजींना फार लाभला नाही. नानाजींवर डॉक्टर हेडगेवार यांचा, त्यांच्या कार्याचा, इतका प्रभाव पडला होता की त्यांनी डॉक्टरांच्या धगधगत्या चितेसमोर परत एकदा प्रतिज्ञा केली की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन व संघाचे कार्य करीन. शिक्षण पूर्ण होण्याअगोदरच १९४० साली त्यांना आग्रा आणि नंतर उत्तर प्रदेश इथे संघाच्या विस्तारासाठी पाठवले गेले. नानाजींनी डॉक्टर हेडगेवारांनी दिलेली विचारांची शिदोरी घेऊन उत्तर प्रदेश गाठला. ध्येयनिष्ठा, श्रद्धा, चिकाटी, लोकसंग्रह, परिश्रम, यांचा पाठ शिकविणारी ही शिदोरी नानाजींना आयुष्यभर पुरली.
उत्तर प्रदेशात गेल्यावर मात्र नानाजींचे व्यक्तिमत्व चहुबाजूनी बहरून आले. त्यांच्यातले वक्तृत्व, संभाषणकौशल्य, संघटन चातुर्य, लोकांना गोळा करण्याची हातोटी असे सगळे गुण चमकून उठले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ हा कालखंड संघाच्या नाही तर संपूर्ण देशाच्या दृष्टीने अस्थिरतेचा गेला. गांधीजींची हत्या झाली. संस्थाने खालसा करण्याची प्रक्रिया चालू होती. काँग्रेस हा एकच मोठा पक्ष राजकारणात होता. गांधी वधानंतर संघावर पहिल्यांदा बंदी घातली गेली. अनेक ज्येष्ठ नेत्यांना तुरुंगात टाकले गेले. निर्वासितांचा प्रश्न उग्र होत होता. यातून संघाचे कार्यकर्ते तावूनसुलाखून बाहेर पडले. १९७७ नंतर 'जनता पार्टी'ची स्थापना झाली. या कालखंडात नानाजींना अत्यंत ज्येष्ठ व विचारी मित्र लाभले जसे, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी बाजपेयी इत्यादी. हे स्नेहसंबंध शेवटपर्यंत अबाधित राहिले.
यानंतरचा आणीबाणीचा काळ कठीण गेला. बऱ्याच नेत्यांना तुरुंगात टाकले होते. महागाई, काही राजकीय धोरणे यामुळे भारतातील सर्व राज्यांत असंतोष होता. यावेळी काही नेते भूमिगत राहून कार्य करीत होते. यानंतर नानाजींच्या संघटनाकौशल्यामुळे 'जनता पक्षा'ची स्थापना झाली. पुढे १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नानाजी बलरामपुर मतदार संघातून प्रचंड मतांनी लोकसभेसाठी निवडून आले. त्यावेळी मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यांनी नानाजींना मंत्रिपद देऊ केले. नानाजींनी ते नाकारले आणि वयाच्या साठाव्या वर्षी राजकारणातून निवृत्ती घेतली. यानंतर त्यांनी १९७९ पासून शेवटपर्यंत समाजातील वंचितांसाठी, आदिवासींसाठी कार्य केले.
त्यावेळची एक आठवण सांगण्यासारखी आहे. १९९८ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. अटलजी नानाजींना मानत, कारण नानाजींचे संघटनकौशल्य अद्भुत होते. एका पत्रकाराने अटलजींना प्रश्न विचारला, "जनसंघात तानाशाही आहे का?" याचे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव जनसंघात जास्त होता. अटलजींनी उत्तर दिले,
" 'तानाशाही' नाही, पण 'नानाशाही' मात्र जरूर आहे" .
१९९९ साली नानाजींच्या सामाजिक कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना 'पद्मविभूषण' पुरस्कार देऊन सन्मानित केले. २००९ मध्ये मध्य प्रदेश सरकारने नानाजींच्या नावाने 'नानाजी देशमुख विद्यापीठ' सुरू केले. १९९७ साली नानाजींच्या वयाला ८१ वर्षे पूर्ण झाली. तेव्हा त्यांनी आपले 'इच्छापत्र' केले. या इच्छापत्रानुसार त्यांनी देहदान केले. मरणोत्तर सुद्धा आपले शरीर समाजाच्या उपयोगासाठी वापरले जावे हा हेतू. आयुष्यभर ते समाजासाठी झटले व मृत्यूनंतरही त्यांनी देहदान केले. एवढेच नव्हे तर पुढचे सोपस्कार करण्यासाठी त्यांनी ११,०००/ रुपये वेगळे ठेवले. त्यांचा मानसपुत्र हेमंत पांडे, व मानसकन्या कुमुद सिंह यांनी देहदान प्रक्रियेची पूर्तता करण्याची व्यवस्था करावी हे ही त्यांनी नमूद केले.
वयाच्या नव्वदीपर्यंत ते अत्यंत जोमाने व उत्साहाने काम करीत होते. मग शरीर हळूहळू थकू लागले. तेव्हा त्यांनी तरुण कार्यकर्त्यांना पत्रे लिहिणे सुरू केले. युवा शक्तीवर त्यांचा दृढ विश्वास होता. पत्रातून ते तरुणांना समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रेरणा देत असत. समाजात परिवर्तन फक्त युवा पिढीच घडवून आणू शकेल अशी त्यांची पक्की धारणा होती.
२००५ नंतर त्यांना चित्रकूट मधील त्यांच्या सियाराम कुटीतून बाहेर पडणे अशक्य झाले. दृष्टी अधू झाली, तरी ते रोज चित्रकूटच्या वेगवेगळ्या कार्यासंबंधी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करीत. त्यांना मार्गदर्शन करीत. पण नंतर त्यांना ऐकू येईनासे झाले. सर्वांना वाटत होते की नानाजींना औषधोपचार व शुश्रुषा यासाठी दिल्लीला न्यावे, पण नानाजींना हे अजिबात मान्य नव्हते. त्यांचे म्हणणे होते, माझा शेवट माझ्या कर्मभूमीतच व्हावा. शेवटी त्यांना चित्रकूट मधल्या 'सद्गुरु सेवा संघ' रुग्णालयात विश्रांती व शुश्रुषेसाठी ठेवण्यात आले.
८ फेब्रुवारी २०१० मध्ये वरिष्ठ नागरिकांचे 'विश्व संमेलन' चित्रकूट येथे भरले होते. नानाजी त्याला उपस्थित राहिले, पण त्यानंतर २७ फेब्रुवारी २०१० रोजी नानाजी पंचतत्त्वात विलीन झाले. एका कृतिशील ब्रह्मर्षीने अत्यंत कृतार्थतेने, समाधानाने आपल्या जीवन यज्ञाची सांगता केली. नवदधीचीचि पंचतत्वात विलीन झाले. त्यांचे नाव जनमानसावर ठळक अक्षरात करून ठेवलेले आहे .
'मैं अपने लिये नहीं | अपनों के लिए हूँ | अपने वो हैं, जो पीडित, शोषित और वंचित हैं |’
हे घोषवाक्य नानाजी प्रत्यक्ष जगले. २०१९ मध्ये नानाजींना भारत सरकारने मरणोत्तर 'भारतरत्न' हा पुरस्कार दिला. नानाजींना परमेश्वराने सामाजिक परिवर्तन आणि ग्रामीण सक्षमीकरणासाठी पृथ्वीवर पाठवले होते. गांधीवादी तत्त्वज्ञान व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांचा भर स्वावलंबन, शाश्वत विकास, स्वदेशी व पारंपरिक तंत्रज्ञानाचा समावेश करणे, संघर्ष मुक्त समाज निर्माण करणे यावर होता. लेफ्टनंट कर्नल डॉक्टर राघवेंद्र जोशी त्यांच्या 'भाग्यविधाता' या नानाजींवर लिहिलेल्या कवितेमध्ये म्हणतात:
इस मिट्टी पर, हर पत्थर पर, नानाजी का नाम खुदा है |
बीच हमारे नानाजी, हम से अब तो जुदा कहाँ है |
मिले हाथ से हाथ, हर कदम आगे बढता चला गया |
बंजर मिट्टी बनी सुहागन इक परचम ऐसा लहराया |
नानाजी का पुण्यस्मरण ही अपना ऊर्जा स्त्रोत है |
हम अपने ही भाग्यविधाता ! मंत्र हमारा याद रहे |