"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"शेतकरी हे लोकशाहीचे खरे आधारस्तंभ आहेत." - स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकरी स्वावलंबी होता. परंतु आजच्या सरकारांनी त्याचे स्वावलंबन संपवले. शेतीचे औद्योगिकीकरण करून भांडवलशहांच्या आधीन केले गेले आहे. हे धोरण लोकशाहीविरोधी आहे.
- नानाजी देशमुख
नानाजींनी राजकारण संन्यास घेतला व ते समाजकारण करू लागले. पंडित दीनदयाळ यांचे प्रगल्भ विचार त्यांच्या मन:पटलावर कोरले गेले होते. नानाजी त्यावर कार्यवाही करीत. त्यांनी दीनदयाळ यांची 'अंत्योदय योजना' ही संकल्पना आणि 'एकात्मक मानव दर्शन वाद' हे विचार निरनिराळ्या प्रकल्पातून प्रत्यक्षात उतरवले. गरीब लोकांना अन्न व औषध पुरवणे हा मुख्य हेतू. नानाजी यांचे सर्व प्रकल्प सदाचार, शिक्षण, आरोग्य व स्वावलंबन या चार खांबांवर उभे होते.
मागासवर्गासाठी आणि आदिवासी लोकांसाठी काहीतरी काहीतरी केले पाहिजे, हे नानाजींच्या डोक्यात घोळतच होते. दिल्ली येथे त्यांनी 'दीनदयाळ शोध संस्थाना'ची निर्मिती केली होती. यानंतर त्यांचे तीन प्रकल्प विशेष करून लक्षात घेण्यासारखे आहेत. ते म्हणजे, गोंडा प्रकल्प, बीड प्रकल्प व चित्रकूट प्रकल्प.
कुठेही एखादा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी नानाजी तिथल्या भौगोलिक प्रदेशाचा आणि हवामानाचा सखोल अभ्यास करीत. त्यानंतर तिथले रहिवासी, त्यांची सामाजिक व आर्थिक स्थिती, त्यांच्या परंपरा, या सर्व गोष्टींचा ते विचार करीत. नानाजींनी संघाचे 'प्रचारक' म्हणून काम करीत असताना संपूर्ण गोंडा जिल्हा पालथा घातला होता. त्यांना तिथल्या परिस्थितीची संपूर्ण जाणीव होती. त्यामुळे गोंडा जिल्ह्यातून कामाला प्रारंभ करावा असे त्यांनी ठरविले. १९७८ मध्ये 'गोंडा प्रकल्पा'ला सुरुवात झाली. उत्तर प्रदेशात असलेला गोंडा जिल्हा सर्वात मागासलेला व बहुतांशी आदिवासी वस्ती असलेला होता. शरयू आणि घागरा नद्यांमधला हा सुपीक प्रदेश. पण तिथे फारसा विकास झाला नव्हता. खरंतर भूगर्भात पाण्याचा साठा होता, पण तो शेतकऱ्यांना उपलब्ध नव्हता. विहिरी खोदल्याशिवाय ते शक्य नव्हते. म्हणून नानाजींनी प्रथम तिथे कूपनलिका खोदण्याचा प्रकल्प हाती घेतला. कूपनलिका खोदणे हे तसे खर्चिक काम होते. सर्वप्रथम २०,००० कूपनलिका खोदण्याची योजना आखली होती. एका कूपनलिकेस साधारणपणे २० ते २५ हजार रुपये खर्च होणार होते. बँकेकडून कर्ज घेतले. खर्च कमी करण्यासाठी नानाजींनी एक युक्ती अमलात आणली. पाईप वापरण्याऐवजी तीन इंची व्यासाचे बांबू एकमेकांना जोडले व ते कूपनलिकेत सोडले. हे बांबू नारळाच्या दोरीने बांधले. बांबू व नारळाची दोरी पाण्यात सडत नाही हे नानाजींना माहीत होते. इथे त्यांची निरीक्षण शक्ती कामी आली. बैल जोडून पंप चालविता येईल असा 'दीनदयाळ पंप' तयार केला. यामुळे विजेची बचत झाली. काही शेतकऱ्यांनी बैलांच्या ऐवजी डिझेल वापरायला सुरुवात केली. अशा प्रकारे सत्तावीस हजार पाचशे ते तीस हजार कूपनलिका दोन वर्षात बांधून झाल्या. सरकारला असे वाटत होते की वीस हजार कूपनलिका एवढ्या कमी वेळात खोदणे अशक्य आहे. पण ठरविलेल्या संख्येपेक्षा जास्तच विहिरी खोदल्या गेल्या आणि हे सर्व शक्य झाले नानाजी व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमामुळे. मनात आणले तर अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखविता येते हे या उदाहरणामुळे कळते. समर्थ म्हणतात, ‘केल्याने होत आहे रे । आधी केले पाहिजे ।’
नानाजींनी प्रकल्प हाती घेण्यापूर्वी गावकरी आळशी होते. 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' अशी त्यांची मनोवृत्ती होती. म्हणून गोंडा जिल्ह्यात अठरा विश्व दारिद्र्य होते. नानाजींनी लोकांच्या मानसिकतेमध्ये परिवर्तन घडवून आणले. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी वर्षाला दोन किंवा तीन पिके घेऊ लागले. यामुळे अगदी कमी जमीन असणारा शेतकरीसुद्धा चारपाच जणांचे कुटुंब सहज पोसायला लागला. याआधी अल्प भूमी असणारा शेतकरी निर्धन होता. पण आता तो या अवस्थेतून बाहेर आला. काही शेतकरी तर मुख्य पिकांबरोबर भाजी व फळझाडेही लावू लागले. लोकांच्यात उत्साह निर्माण झाला.
काही बँकेच्या अधिकाऱ्यांना वाटत होते की बँकेने कर्ज दिले आहे. पण ते काही परत मिळणार नाही. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की बहुतेक सर्व शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली. तेव्हाचे रिझर्व बँकेचे गव्हर्नर, श्री मनमोहन सिंग, यांनी पाहणीसाठी पथक पाठवले. काम पूर्ण झालेले पथकाने पाहिले. एवढेच नाही तर कर्जाची परतफेड पण बऱ्यापैकी झाली होती. हे पाहून सर्वांना समाधान वाटले. नानाजींचे सर्व प्रकल्प सदाचारावर अधिष्ठित होते. या प्रकल्पामुळे नानाजी, व गोंडा प्रकल्पाला देशभर प्रसिद्धी मिळाली .
गोंडा जिल्ह्यात त्यावेळी २५ तालुके व २८१४ गावे होती. एकूण लोकसंख्येपैकी ९४ टक्के लोक खेड्यात राहणारे शेतकरी होते. यात सुद्धा भूमिहीन शेतमजूर जास्त होते. ज्यांच्याकडे शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांमध्ये सुद्धा ७४ टक्के शेतकरी अल्पभूधारक होते. या अल्पभूधारकांकडे फक्त दीड ते अडीच एकर जमीन होती व मासिक उत्पन्न फक्त चारशे रुपये होते. 'प्रत्येक हाताला देऊ काम, प्रत्येक शेतीला देऊ पाणी' हा नानाजींचा नारा होता. तो पूर्ण करण्यासाठी त्यांनी अविश्रांत कष्ट घेतले.
'दीनदयाळ शोध संस्थाना'ने प्रेरणा दिली. शेतकऱ्यांनी सरकारी अनुदानातून, बँकेच्या कर्जातून कूपनलिका खोदण्याचे काम यशस्वी करून दाखविले. पाण्याचा प्रश्न सुटला. त्यामुळे शेतीमध्ये श्रम करण्याची शेतकऱ्यांची वृत्ती वाढली. त्यातून शेतीचे उत्पादन वाढले. शेतकरी निर्धन अवस्थेतून बाहेर आले. नानाजींच्या या प्रकल्पाचे देशविदेशात खूप कौतुक झाले. अनेक वर्तमानपत्रातून त्यांच्या कामाला प्रसिद्धी मिळाली. यामुळे देशी व परदेशी पत्रकार हा चमत्कार पाहायला गोंडा जिल्ह्यात येऊ लागले.
स्वावलंबन व आत्मनिर्भरता हा नानाजींनी जो प्रकल्प सुरू केला त्याचा पाया होता. आजूबाजूच्या परिसरात जे नैसर्गिक रीत्या उपलब्ध आहे, त्याचा उपयोग करून शेती, कला व उद्योग यांचा विकास घडवून आणण्यासाठी नानाजी प्रयत्नशील होते, आग्रही होते. यासाठीच त्यांनी कूपनलिका खोदताना ग्रामस्थांना श्रमदान करण्याचे आवाहन केले.
यानंतर नानाजींनी आपले लक्ष शेतीकडे, शेत जमिनीकडे वळवले. भारत हा कृषिप्रधान देश आहे. गोंडा जिल्ह्यात तर शेती हा ९०% लोकांचा व्यवसाय होता. त्यांचा उदरनिर्वाह त्यावरच अवलंबून होता. भारतात शेती पावसावर अवलंबून आहे. पाऊस कमी पडला तर दुष्काळाचे सावट; जास्त पडला तर पीक वाहून जाणार, कुजणार, ही समस्या! अर्थात पाऊस किती पडणार हे माणसाच्या हातात नाही. पण जमिनीचा कस टिकवून ठेवणे हे तर शेतकऱ्यांच्या हातात आहे. नानाजींच्या असे लक्षात आले की ९०% लोकांची शेती तोट्यात होती, कारण बहुतेक ठिकाणी रासायनिक खतांचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे जमीन नापीक झाली होती. याशिवाय रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे आरोग्य विषयक समस्या पण निर्माण झाल्या होत्या. शेतकरी अज्ञानी होते. त्यामुळे त्यांना हे सर्व समजावून सांगणे गरजेचे होते. यासाठी ठिकठिकाणी 'कृषी विज्ञान केंद्रे' उभी केली. तिथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
गोंडा जिल्ह्यात 'ग्रामविकासाच्या प्रकल्पाची' पायाभरणी होत असताना भारताला एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागले. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा भाग १९७७ साली तुफानी वादळाच्या तडाख्यात सापडला. 'अवनीगड्डा' या तालुक्याला सर्वात जास्त हानी पोहोचली. 'मुलापालम' हे गाव पूर्णपणे उध्वस्त झाले. सगळी घरे वाहून गेली. शेकडो कुटुंबे बेघर झाली. त्यांनी सर्वस्व गमावले. अशा संकट प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक मदतीला धावून आले. नानाजी सुद्धा तिथे गेले. गावाचे पुनर्वसन करायला निधी पाहिजे होता. नानाजींनी इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे रामनाथजी गोयंका यांच्याकडे पैशासाठी बोलणी केली. गोयंकांनी ताबडतोब पाच लाखाचा धनादेश दिला. व मग एक्सप्रेस समूहाने निधी गोळा करून, एक कोटी रुपयांचे सहाय्य दिले. स्वयंसेवकांनी शंभर घरे बांधून गावाचे पुनर्वसन केले. या गावाचे नाव ठेवले 'दीनदयाळ पुरम'. पुढे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चेन्ना रेड्डी व तत्कालीन परराष्ट्रमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी या गावाचे उद्घाटन केले. रामनाथजी गोयंका व नानाजी यांच्यात मैत्री प्रस्थापित झाली. नानाजी त्यांच्या घरचे सदस्य झाले. रामनाथ गोयंका पुढच्या काळात नानाजींच्या ग्रामोदय प्रकल्पात एक खंबीर समर्थक होते.
'पंडित दीनदयाळ संस्थाना'मध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्याकरता एक स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. भूकंप, वादळ, पूर, अशा कुठल्याही नैसर्गिक आपत्तीत हे केंद्र सहाय्य उपलब्ध करून देते. या संस्थेची मुख्य इमारत दिल्ली येथे असली तरी अहमदाबाद, चित्रकूट इथेही त्यांच्या शाखा आहेत.
नीलम संजीवरेड्डी यांच्या हस्ते गोंडा प्रकल्पाचे उदघाटन