"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"प्रत्येक व्यक्ती समाजाचा भाग आहे, हे लक्षात ठेवा." - जात, धर्म, भाषा, प्रदेश या आधारावर माणसात भेद करणे हे भारतीय तत्त्वज्ञानाशी विसंगत आहे. प्रत्येक व्यक्तीकडे ‘माणूस’ म्हणून पाहिले गेले पाहिजे.
- नानाजी देशमुख
माझ्या प्रिय तरुण बंधू व भगिनींनो,
फार पूर्वीपासून भारतात लोकतंत्र आहे. हे लोकतंत्र किंवा लोकशाही फक्त शासन व्यवस्थेपर्यंत नसून ते आपल्या सामाजिक जीवनाचा एक भाग बनले आहे. भारतात बहुतेक समाज शेती करीत होता, त्यामुळे हा अन्नदाता शेतकरी लोकतंत्र्याचा मोठा आधारस्तंभ होता. ब्रिटिशांच्या काळात सुद्धा त्याने आपले स्वावलंबन अबाधित ठेवले होते.
परंतु १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या या स्वावलंबनावर घाला घातला आहे.
पश्चिमेकडील भांडवलशाही व रशिया चीनचा साम्यवाद हे दोन्ही लोकशाहीला प्रतिकूल आहेत. भारत सरकारने लोकशाहीच्या मूलभूत सिद्धांताला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. सरकार फक्त सत्ता संघर्षातच व्यग्र आहे.
पाश्चिमात्य देशांच्या प्रभावाखाली येऊन आपल्या सरकारने शेतीचे औद्योगीकरण करायला सुरुवात केली. शेतीत यंत्रे वापरायला सुरुवात केली. याचा फायदा मोठ्या शेतकऱ्यांना झाला. मोठ्या शेतकऱ्यांना मशीन किंवा यंत्रे वापरून शेती करणे सुलभ होऊ लागले. आपल्या सरकारने शेतीविषयक अशी नीती अवलंबली की शेतीमध्ये यांत्रिकीकरण झपाट्याने वाढत गेले आहे.
शेतीत यंत्रे वापरायला सुरुवात केल्यावर खतांची गरज पण वाढली. पाश्चिमात्य देशाने जमिनीचे वैज्ञानिक विश्लेषण करायला सुरुवात केली. मातीची रासायनिक चाचणी करून त्यांनी शेतीत रासायनिक खते वापरायला सुरुवात केली.
जसे एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला दारू पिऊन स्फूर्ती येते किंवा तरतरी येते त्याप्रमाणे या रासायनिक खतांमुळे लगेच लाभ झाला असे दिसून आले. पण या रासायनिक खतांमुळे पिकावर निरनिराळे रोग पडू लागले. रोग निवारण करण्यासाठी परत रासायनिक कीटकनाशके वापरली जाऊ लागली. अशा पद्धतीने आपल्या इथे ‘रासायनिक कृषी पद्धती’ सुरू झाली.
या रासायनिक खतांचे, कीटकनाशकांचे, शेतीत वापरल्या जाणाऱ्या यंत्रांचे उत्पादन भांडवलशाही देशात होते. यामुळे आपल्या आत्मनिर्भर शेतकऱ्यांना शेतीत लागणाऱ्या यंत्रांसाठी भांडवलशाही देशांवर अवलंबून राहावे लागले. ही पद्धत शेतकऱ्यांसाठी प्रतिकूल तर भांडवलशहांसाठी अनुकूल आहे. यामुळे भांडवलशहांना असंख्य शेतकऱ्यांचे शोषण करणे सहज सोपे झाले आहे. अमेरिकेमध्ये या रासायनिक खतांचा किंवा यंत्रांचा दुष्परिणाम फारसा दिसून येत नाही. कारण अमेरिकेत लोकसंख्येच्या फक्त चार ते पाच टक्के लोक शेतीशी संलग्न आहेत. परंतु भारतात मात्र ७० टक्के लोक शेती करतात. म्हणून शेतीचे औद्योगिकरण होणे हा भारतासाठी शाप आहे.
संपन्न अशा पाश्चिमात्य राष्ट्रांनी औद्योगिक विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ते अधिकाधिक समृद्ध होत आहेत. त्यांनी शेती हा सुद्धा एक ‘उद्योग’च मानला आहे.
आपल्या इथे प्राचीन काळापासून शेती व्यवसाय चालत आला आहे. आपली शेतीची पद्धत दीर्घ अनुभवावर आधारित आहे.
धान्य उत्पादन ही एक जैविक प्रक्रिया आहे. तिचे रासायनिक विश्लेषण करता येईल, पण रासायनिक गोष्टींवर अवलंबून शेती करणे हे ‘नैसर्गिक’ नाही, हे पाश्चिमात्य संशोधक समजू शकत नाहीत.
रासायनिक गोष्टींवर अवलंबून शेती केल्यामुळे खालील दुष्परिणाम दिसून येत आहेत.
१) ही पद्धत लोकतंत्र्याच्या प्रतिकूल, तर भांडवलशाहीला अनुकूल आहे.
२) या पद्धतीमुळे शेतकरी भांडवलदारांवर अवलंबून राहू लागले आहेत.
३) रासायनिक खतांचा वापर करून जमिनीची सुपीकता कमी कमी होत आहे आणि म्हणून रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरावी लागत आहेत. यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत आहे.
४) रासायनिक कीटकनाशके व रासायनिक खते वापरल्यामुळे धान्य, फळे व भाज्यांत विषारी तत्वे मिसळतात. त्यांच्यामुळे माणसाला अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.
५) या रासायनिक पदार्थांमुळे फक्त मातीच नाही, तर भूगर्भातील पाणी पण प्रदूषित होते.
या वर सांगितलेल्या दुष्परिणामांमुळे अनेक देश आता ‘सेंद्रिय शेती’कडे वळू लागले आहेत. परंतु आपल्या इथे मात्र आधुनिकतेच्या नावाखाली आपले नेते पाश्चिमात्य राष्ट्रांचे अंधानुकरण करीत आहेत. ते भांडवलशाहीतून स्वतःला मुक्त करू शकतील का ?
भारतीय संस्कृती, व सभ्यता जगात आपली विशेषता राखून आहे. भारतीय परंपरा सर्व ‘उपकारक तत्त्वांना’ पूजनीय मानते. आपण हिमालयाला ‘देवता’, गंगेला ‘आई’, भूमीला ‘भूमाता’, गायीला ‘गोमाता’, असे मानतो. भारतीय संस्कृती निसर्गाचे स्वार्थी बुद्धीने शोषण करायला शिकवीत नाही. आपण स्वतःला या ‘निसर्गाचे पुत्र’ मानतो. जसे एखादे बालक आईचे दूध पिऊन स्वतः बलवान होते व आईला पण सुख देते, त्याचप्रमाणे आपण निसर्गाचे शोषण करीत नाही, तर त्याचे संवर्धन करतो.
भारतीय परंपरेनुसार शेतकरी आपल्या जमिनीला पूज्य मानतो व आपण तिची लेकरे आहोत, असा भाव मनात बाळगतो.
इंग्रजी शिक्षण मिळालेले लोक उपभोग घेऊ इच्छितात. ते देशी गायींचे महत्व समजत नाहीत. ते गायीला दूध देणारा एक प्राणी असे समजतात. थंड प्रदेशातल्या गायी जास्त दूध देतात म्हणून आपल्या नेत्यांना त्या गायींबद्दल आकर्षण आहे. त्यांनी ‘हॉलस्टेन’, ‘स्विस ब्राऊन’ आणि ‘जर्सी नस्क’ अशा परदेशी वळूंचे वीर्य आणून आपल्या देशी गायींचे कृत्रिम रित्या गर्भधारणा करायला सुरुवात केली आहे. ही गोष्ट फार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे आज आपल्या देशात देशी गायी सापडणे कठीण झाले आहे. या अशा प्रकारामुळे आपल्या देशाचे किती नुकसान झाले आहे याचा अंदाज घेणे खूप कठीण आहे.
देशी गायी भारताच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहेत, कणा आहेत. गाय व शेती एकमेकांपासून वेगळे नाहीत. गायींपासून माणसाला दूध मिळतेच, परंतु जैविक शेती गोवंशावरच अवलंबून आहे. आधुनिक शिक्षण घेणाऱ्यांना हे माहीत नाही.
देशी गायींपासून मिळालेले बैल शेतीलाच उपयोगी पडतात असे नाही, तर दळणवळणासाठी पण त्यांचा उपयोग होतो. आजही जरी मोठ्या प्रमाणात रेल्वे व रस्ते भारतात असले तरी आपल्या दळणवळणातील ५० टक्के भाग या बैलांमुळेच होतो.
गायींच्या शेणापासून खत तयार होते, त्यासाठी शेतकऱ्याला वेगळा खर्च करावा लागत नाही. शेतीसाठी जी उपकरणे वापरतात त्यामुळे गावातल्या लोहारांना काम मिळते. अशा प्रकारे शेती हा व्यवसाय लोकतंत्राचा प्रमुख आधार आहे.
झाडांवर पडणाऱ्या रोगांचे निवारण करण्यासाठी गोमूत्र उपयोगी पडते. जर पिकांवर जास्त प्रमाणात किड्यांचा प्रादुर्भाव झाला तर गोमूत्रात कडुलिंबाची पाने दहा दिवस सडत ठेवून ते मिश्रण पाण्यात तीन टक्के प्रमाणात मिसळून पिकांवर शिंपडले तर त्या घातक कीटकांचा नाश होतो. याशिवाय बिया जमिनीत टाकल्यापासून फुले येईपर्यंत पाण्यात दोन टक्के शुद्ध गोमूत्र मिसळून पंधरावीस दिवसांनी एकदा शिंपडले तर पीक लवकर येते, रोपे सशक्त होतात व धान्य उत्पादन वाढते. हे सर्व प्रयोगांती सिद्ध झाले आहे. हे सर्व देशी गायीच्या मूत्रामुळेच शक्य होते.
संकरित गाईंपासून जे बैल जन्माला आले ते कशासाठीच उपयोगी नाहीत. त्यांचा उपयोग ना ही शेतीत, ना दळणवळणासाठी. पाश्चिमात्य देशात अशा बैलांचे मांस खातात. आपल्या इथे तेही शक्य नाही.
आपल्या परंपरेत प्रत्येक शेतकरी हा गोपाल होता. शेतकऱ्याकडे गाय नाही असा शेतकरी शोधून सुद्धा सापडत नव्हता. सर्व शेतकऱ्यांकडे दूध, दही, मठ्ठा उपलब्ध होते. त्यामुळे आपल्या इथे शेतकऱ्यांच्या घरी कुपोषण नव्हते. दूध विकायची पद्धत तर भारतात नव्हतीच.
आपण जे धान्य किंवा अन्न खात नाही ते गोवंश खातात. वृद्ध गायी किंवा बैल जे काम करू शकत नाहीत ते शेतकऱ्यांना ‘ओझं’ वाटत नव्हते. प्रत्येक वृद्ध गाय किंवा बैल रोज कमीत कमी १३ किलो शेण देतात. हे शेण ‘गोबर गॅस’ बनवायला उपयोगी पडते. शिवाय त्यापासून खत सुद्धा बनवता येते. गायी व बैल मेल्यानंतर त्यांची त्वचा, हाडे, शिंग व खूर विकून पैसे मिळतात.
त्यांच्या हाडांचा चुरा हे ‘जैविक खत’ म्हणून उपयोगी पडते. हे खत वापरून प्रति एकर शेतीची उत्पादन क्षमता वाढते हे अनुभवावरून सिद्ध झाले आहे. आता जगभर ‘जैविक कृषी पद्धत’ वापरायला सुरुवात झाली आहे.
आपल्या देशातील तरुणांना जैविक कृषी पद्धत जगाला दाखवून देण्याची एक अनोखी संधी प्राप्त झाली आहे.
आपला शुभचिंतक,
नाना देशमुख .