"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"भारताचे भवितव्य ग्रामीण भारतात आहे." - खरे भारत शहरांत नाही, तर गावांत राहतो. ग्रामीण भागाचे सर्वांगीण उन्नयन झाले तरच भारत खऱ्या अर्थाने प्रगत होईल. ग्रामविकास हीच खरी राष्ट्रसेवा आहे.
- नानाजी देशमुख
प्रिय तरुण बंधू आणि भगिनींनो,
विशाल भारत नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. एकाच वेळी आपल्या देशात निरनिराळे हवामान अनुभवायला मिळते. निरनिराळ्या प्रदेशात नानाविध प्रकारची वनसंपदा उपलब्ध आहे. अनेक प्रकारची खनिजे आपल्या भूगर्भात सापडतात. फळे, फुले, तृणधान्यांचे अनेक प्रकार आपल्या इथे दिसून येतात. आपल्या इथे भाषा, लिपी, कपडे, राहणीमान याच्यात विविधता आढळून येते आणि हीच आपली विशेषता आहे.
एवढी विविधता असून सुद्धा हजारो वर्षांपासून आपल्या देशात एकात्मतेची अखंड परंपरा चालत आली आहे. (विविधतेत एकात्मता) अर्थात हे आपल्या पूर्वजांनी केलेल्या कठोर साधनेचे फळ आहे. कुंभमेळा, चारधाम यात्रा, अमरनाथची यात्रा अशी असंख्य श्रद्धा केंद्रे आपल्या सामाजिक एकात्मतेची प्रतीके आहेत.
काळाचा प्रबळ प्रवाह, नेतृत्वाची क्षीण झालेली क्षमता, परदेशीयांची आक्रमणे व गुलामी अशा अनेक कारणांमुळे आपल्या एकात्मतेच्या भावनेवर सतत प्रहार होत होते. चराचरात आत्मतत्त्व भरलेले आहे ही आपली जीवनदृष्टी क्षीण झाली आहे. यामुळे समाजात विघटन, अशांती, अनाचार व कलह वाढत चालले आहेत.
प्रगत व संपन्न देशांमध्ये ‘आत्मतत्त्वा’चा बोध दुर्लभ आहे. कारण त्यांनी उपभोग घेणे हेच जीवनाचे लक्ष मानले आहे. उपभोगवादी वृत्ती व्यक्तिगत सुखातच समाधान मानते.
अशा देशांमध्ये कौटुंबिक जीवनात आत्मतत्त्व ही भावना आढळणारच नाही. तेथे पतीपत्नी आयुष्यभर एकत्र राहतील असे सुद्धा नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत नवीन पिढी व्यक्तिगत जीवनाला महत्त्व देईल हे स्वाभाविकच आहे.
अशा उपभोग प्रधान देशांचा प्रभाव भारतावर पडला आहे, व तो दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पंडित दीनदयाळ यांना चिंता वाटू लागली. देहधारी माणसाने उपभोग घेतला पाहिजे. परंतु माणसाचा जन्म केवळ उपभोग घेण्यासाठी झालेला नाही. माणूस जन्मजात संवेदनशील असतो. तो दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो. दुःखी लोकांचे दुःख दूर करण्यात त्याला आगळेच सुख मिळते. यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे. दुःखी लोकांप्रती संवेदनशीलता नसली तर माणूस पशू बनून जाईल. पण दुर्दैवाने आज आपला देश या संवेदनहीन मार्गावर चालला आहे. अशामुळे भारत ‘भारत’ राहणार नाही तर तो उपभोग प्रधान देशांचा अनुगामी बनेल. यामुळे जगातील माणुसकी संपुष्टात येईल असे वाटते.
हा धोका लक्षात घेऊन स्वर्गीय दीनदयाळ यांनी ‘एकात्म मानव दर्शन’ हा उपाय सांगितला. त्यांनी हा विचार देशातील प्रतिष्ठित जेष्ठ विचारवंतांसमोर मांडला. त्यांच्याबरोबर विस्तृत स्वरूपात विचार विनिमय केला. स्वर्गीय राजगोपालाचारी यांनी या विचारांची प्रशंसा केली. परमपूज्य गुरुजींनी याला ‘सामाजिक संजीवनी’ असे म्हटले. भारतीय जनसंघाच्या विजयवाडा इथल्या अधिवेशनात सर्वांच्या संमतीने पंडित दीनदयाळ यांचा हा विचार सर्वांनी मान्य केला.
परंतु दीनदयाळ यांच्या हत्येनंतर ‘एकात्मक मानव दर्शन’ या विचाराला तिलांजली दिली गेली.
एकात्म मानव दर्शन हे ‘भारतीय जीवन दर्शनाचे’ नवीन नाव आहे असे आपण मानू शकतो. भारतीय जीवन दर्शन माणसामाणसांमध्ये भेद करीत नाही. असे नसते तर चराचरात एकच आत्मतत्त्व भरलेले आहे हा अनुभव मिळण्याची शक्यताच नव्हती. प्रत्येक नागरिक हा ‘माणूस’ म्हणून त्याच्याशी व्यवहार केला पाहिजे. माणसाची भाषा, जात, प्रदेश, उपासना पद्धती यावरून माणसा माणसात भेदभाव करणे योग्य नाही.
भारतीय जीवनदर्शनाची स्वतःची आर्थिक जीवनदृष्टी आहे. इतर देशात व्यक्तिगत समृद्धीसाठी काम करण्याची प्रेरणा मिळते. व्यक्तिगत समृद्धीसाठी तिथे व्यावसायिक संघटन होते. परंतु भारतात वेगळीच आर्थिक जीवनदृष्टी आहे. इथे व्यवसायावर आधारित जाती तयार झाल्या. प्रत्येक जातीचे उद्दिष्ट संपूर्ण समाजाची एक गरज पूर्ण करणे हे होते. व्यक्तिगत समृद्धीसाठी जाती तयार झाल्या नव्हत्या. प्रत्येक व्यक्ती संपूर्ण समाजाला आपला परिवार मानून त्याला सुखी व समृद्ध बनविण्यासाठी आपले आयुष्य घालवित असे. संत कबीर यांचे जीवन याचा एक उत्तम नमुना आहे. भारतात असे संत जवळ जवळ सगळ्या जातींमध्ये जन्माला आले आणि याचमुळे भारतात जाती संघर्ष ही कल्पना कधी निर्माण झाली नव्हती. जाती संघर्षामुळे समाजात द्वेष, विघटन व कलह निर्माण होतात. हे एकात्मतेच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. ही वस्तुस्थिती नीट न समजल्यामुळे जो माणूस समाजात एकात्मता प्रतिपादन करतो, तोच माणूस जाती संघर्षाच्या बाजूने पण बोलतो. असे परस्पर विरोधी कार्य स्वतंत्र भारतात चालू आहे.
भारताची औद्योगिक नितिसुद्धा एकात्मतेच्या आधारावर चालत होती. उद्योगाची तीन अंगे आहेत. भांडवल, श्रम व व्यवस्था (प्रबंध). उद्योगाची सफलता या तीन अंगांच्या परस्पर पूरकतेवर अवलंबून आहे. उद्योगाचे उद्दिष्ट समाजाची गरज पूर्ण करणे हे होते. उद्योग किंवा व्यवसाय हा एका परिवाराकडे असायचा. त्यामुळे समाजात विषमता नव्हती किंवा बेकारीचा संभव नव्हता. स्वतंत्र भारताने याच आधारावर औद्योगिक निति विकसित करायला हवी होती.
जयप्रकाशजींची ‘समग्र क्रांती’ व दीनदयाळ यांचे ‘एकात्म मानव दर्शन’यांचे उद्दिष्ट एकच होते. ते म्हणजे भारतीय सामाजिक जीवनदृष्टीला पुनर्प्रस्थापित करणे.
परमपूज्य गुरुजींच्या आशीर्वादाने ‘दीनदयाळ शोध संस्थां’चा जन्म झाला. त्यांच्याच हाताने त्याचे उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी पाँडिचेरीच्या अरविंद आश्रमाच्या पूज्य माताजींनी आपले आशीर्वाद पाठवले होते. दीनदयाळ शोध संस्था ‘एकात्म मानव दर्शन’ या विचाराला धरतीवर साकार करण्यासाठी समर्पित आहे.
संस्थानाने या कार्याचे अनेक ग्रामीण भागामध्ये प्रयोग करून पाहिले आहेत. या प्रयोगांच्या आधारावर चित्रकूट क्षेत्र विकसित केले जात आहे.
या अनुभवामुळे ‘एकात्म मानव दर्शन’ याची व्यवहारिकता समजून येत आहे.
आपला शुभचिंतक,
नाना देशमुख.