"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"शेती औद्योगिक नव्हे, जैविक असली पाहिजे." - रासायनिक शेती ही भारतासाठी शाप ठरली आहे. जमिनीची सुपीकता, माणसांचे आरोग्य, भूगर्भजल — सगळे यामुळे धोक्यात आले. म्हणूनच सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे.
- नानाजी देशमुख
१९७८ ते १९९० पर्यंत, म्हणजे बारा वर्षे नानाजी गोंडा प्रदेशात राहिले. एक तप त्यांनी तिथे व्यतीत केले असे म्हणता येईल. ही बारा वर्षे ते ग्रामविकास कसा होईल, शेतकरी बंधू आपल्या शेतात जास्त पीक कसे घेऊ शकतील, तिथल्या लोकांना निरामय आयुष्य कसे जगता येईल, अशा अनेक विषयांवर चिंतन मनन करून त्यावर कार्यवाही करीत होते. ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे. ही तपश्चर्या आहे एका कर्मयोग्याची. पूर्वीच्या काळात ऋषींप्रमाणे एकांतात राहून, साधना करून नानाजींनी तपश्चर्या केली नाही. त्यांची तपश्चर्या लोकांच्यात राहून, लोकांच्या बरोबर केलेली होती. ते अभिनव ऋषीच होते. पूर्वीचे ऋषी लोककल्याणासाठी परमेश्वराकडे मागणे मागत, या ऋषींनी लोककल्याण केले.
नानाजींनी १९८४ मध्ये बीड जिल्ह्यात सामाजिक कार्य करण्यास प्रारंभ केला. 'गोंडा' प्रकल्पापेक्षा 'बीड प्रकल्पा'चा विस्तार व व्याप लहान आहे. बीड मराठवाड्यातील एक जिल्हा. बीड सर्वात मागासलेला भूभाग. पाऊस कमी, डोंगर दऱ्या जास्त, जमीन बरीचशी खडकाळ, नदी वाहते पण तिलाही बारा महिने पाणी नसते, अशी अवस्था. पाण्याचे दुर्भिक्ष. नानाजींनी पाणी, शेती व शिक्षण या तीन गोष्टींचा विचार करून इथे तीन प्रकल्प सुरू केले.
पाटोदा तालुक्यात डोमरी गावाजवळ सोनदरा येथे पाण्यासाठी 'धन्यता अभियान डोमरी' हे सुरू केले. या प्रदेशात जे तलाव होते ते गाळाने भरले होते. तो गाळ काढून टाकणे महत्त्वाचे होते. नानाजींनी गावकऱ्यांना त्याचे महत्त्व पटवून देऊन तरुण स्वयंसेवकांकडून तलावामधला गाळ काढून घेतला. तलावाभोवती झाडे लावली. त्यामुळे सभोवतालच्या मातीची धूप थांबली. तलावातून जो गाळ काढला होता तो शेतात टाकला, त्यामुळे तिथे पीक काढणे शक्य झाले. दरवर्षी सरकार कोट्यावधी रुपये खर्च करीत होते. पण गावकरी सुजाण झाल्याशिवाय कुठलाही प्रकल्प यशस्वी होऊ शकत नाही हे नानाजींनी जाणले होते. १९८७ साली तलावाची डागडुजी झाली. मग डोमरी ते सोनदरा हा दोन किलोमीटर लांबीचा रस्ता या स्वयंसेवकांनी केला. स्वयंसेवकांचे राहणे, खाणे-पिणे याची पूर्ण सोय गावकऱ्यांनी केली. ३१ दिवस ३६० युवक युवती श्रमदान करीत होते. दोन वेळा मोठे वादळ झाले. मुसळधार पाऊस पडला पण कोणीही स्वयंसेवक आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत घरी निघून गेला नाही. या प्रकल्पामुळे अजून एक फायदा असा झाला की युवकांच्या मनात समाजाप्रती आपली जबाबदारी आहे, ही जाणीव जागृत झाली. या प्रकल्पासाठी रॅलीज रेडिओचे चेअरमन श्री. शेठ यांनी आर्थिक मदत केली. याशिवाय नस्ली वाडिया, जे.पी. गोयंका यांनी पैशाची मदत केली. टेल्कोने तलावाच्या कामासाठी योग्य ती यंत्रे देऊन मदत केली. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीशिवाय हा प्रकल्प पूर्ण झालाच नसता. नानाजींच्या एका शब्दाखातर लोक सर्व प्रकारची मदत करीत. कारण त्यांना माहीत होते की ही मदत योग्य ठिकाणी वापरली जात आहे. हा प्रकल्प चालू असताना संध्याकाळच्या वेळात विविध विषयांवर तज्ञांची व्याख्याने झाली. त्यामुळे युवकांना अनेक नवीन गोष्टी माहित झाल्या. याशिवाय संगीत, कला, उत्तम चित्रपट असे कार्यक्रम पण होत असत. या योजनेचा गौरव देशविदेशात करण्यात आला.
बीड मधली दुसरी योजना म्हणजे 'सोनदरा गुरुकुलम डोमरी'. बीड जिल्ह्यात बहुसंख्य लोक अत्यंत गरीब आहेत. शेतीसाठी योग्य जमीन व पाणी नसल्यामुळे बहुतेक लोक मोसमाच्या काळात ऊस तोडणीसाठी जातात. बहुतेक तरुण माणसे या कामासाठी बाहेरगावी जात. मग लहान मुले व वृद्ध घरात रहात. अशा परिस्थितीत मुलांना शिक्षण मिळणे दुरापास्तच. म्हणून नानाजींनी बीड पासून २० किलोमीटर अंतरावर डोंगरी गावाजवळील 'सोनदरा पाझर' तलावाजवळ एक गुरुकुल स्थापन करण्याचे ठरविले. त्यावेळी सुदैवाने एक तरुण श्री सुदाम भोंडले हे पदवी घेऊन गावात आले होते. त्यांनी आपली शेतीची जागा शाळेसाठी दिली. प्रथम पाचवीचा एक वर्ग सुरू झाला. मग दरवर्षी एक वर्ग वाढत गेला. याचबरोबर विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा वाढू लागली. १९८६ साली निवासी 'गुरुकुला'चा शुभारंभ झाला. जागा अतिशय रम्य होती. चारही बाजूनी डोंगर. त्यावर हिरवेगार वृक्ष. पक्षांचा मधुर किलबिलाट. गुरुकुलासाठी श्री अच्युतराव पटवर्धन यांनी आर्थिक मदत केली. अच्युतराव समाजवादी पक्षाचे. त्यांना लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त दिला जाणारा पुरस्कार मिळाला. त्यांनी ती रक्कम या गुरुकुलासाठी दिली. कारण १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत भूमिगत असताना सोनदरा जवळच्या दऱ्याखोऱ्यात ते राहत होते.
'गुरुकुल' म्हणजे प्रथम झोपड्या होत्या. नंतर नानाजींनी खासदार फंडातून आणि सहाय्य निधीतून वसतिगृह बांधले. शिवाय शिक्षकांना राहण्यासाठी व कार्यकर्त्यांसाठी निवास बांधले. वसतिगृहाच्या बाजूला फळझाडे लावली आहेत. जवळच जलतरण तलाव आहे. तिथले दिवे सौरऊर्जेवर चालतात. वसतिगृहात गायी पाळल्या आहेत. त्यामुळे मुलांना दूध तर मिळतेच, याशिवाय गोबर गॅस व शेणापासून खत तयार करता येते. पारंपरिक शिक्षणाबरोबर मुलांना व्यावसायिक शिक्षणही दिले जाते. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून एक ग्रंथालय आहे.
याच परिसरात 'उद्यमिता विद्यापीठ' उभारले आहे. इथे मुलांना व महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. महिलांना शिवणकाम, मसाले, लोणची, पापड बनवणे इत्यादी कुटीरोद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते. महिला स्वावलंबी झाल्या पाहिजेत, हा त्यामागचा हेतू. हे सर्व प्रकल्प आजही व्यवस्थित चालत आहेत .
भारतात बहुसंख्य लोक खेड्यात राहतात. पूर्वी खेड्यांमध्ये '१२ बलुतेदार' पद्धती होती. म्हणजे गावातल्या लोकांना जे जे लागते ते सर्व गावातले लोकच पुरवत. लोहार, चांभार, तांबट, शिंपी इत्यादी लोक म्हणजे 'बलुतेदार'. इंग्रजांच्या काळात हे व्यवसाय नामशेष झाले. म्हणून खेड्यातले अनेक लोक बेरोजगार झाले. ते शहराकडे येऊ लागले. यामुळे शहरावरचा ताण वाढला. असे होऊ नये, खेड्यातल्या युवकांना खेड्यातच काम मिळाले पाहिजे म्हणून 'उद्यमिता विद्यापीठ' उभारले गेले. खेड्यात नैसर्गिक उत्पादने पुष्कळ आहेत. कृषीजन्य, वनजन्य व पशुजन्य कच्च्या मालावर प्रक्रिया करून उद्योग करता येतो. आपल्या देशाचा कणा खेडी आहेत. त्यामुळे खेड्यांचा विकास झाला तर पर्यायाने देशाचा विकास होईल. निसर्गाचे संतुलन बिघडू न देता खेड्यात अनेक उद्योग सुरू करता येतील. 'दीनदयाळ शोध संस्थां'नी ५०० गावांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर उद्यमिता विद्यापीठाची स्थापना केली. यात बेकरी, हळद, तिखट, मसाले बनवणे, स्क्रीन प्रिंटिंग, विटा तयार करणे, फळांपासून सरबते, व मुरांबे बनवणे याचे प्रशिक्षण दिले जाते. तयार माल कुठे व कसा विकायचा याचेही प्रशिक्षण दिले जाते.
नानाजी जिथे प्रकल्प उभा करीत, तिथल्या समस्या ते समजावून घेत. त्या प्रदेशातील नैसर्गिक संपदा, दळणवळण, इत्यादी गोष्टींचा सखोल अभ्यास करून मगच ते प्रकल्पाला सुरुवात करीत. या कार्यशैलीमुळे त्यांचे प्रकल्प यशस्वी होत. अर्थात यालाही काही अपवाद आहेत.
ग्रामोद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी, छोट्यामोठ्या उद्योगांचे प्रशिक्षण देण्यासाठी, नानाजींनी एकदा कार्यशाळांची आखणी केली. जयप्रभा ग्राम येथे सात कार्यशाळा आयोजित केल्या. यासाठी नानाजींनी सरकारकडून अनुदान घेतले होते. पण कार्यशाळा मूळ योजनेप्रमाणे झाल्या नाहीत म्हणून नानाजींनी सर्व रक्कम सरकारला परत दिली. 'सरकारचा' पैसा हा 'समाजाचा' असतो. त्याचा योग्य तो उपयोग केला पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. ‘सरकारचा पैसा वाया घालवण्याचा अधिकार आपला नाही’ असे ते म्हणत आणि त्या तत्त्वाप्रमाणे ते वागले.
धन्य ते नानाजी.!