"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"शक्तिशाली राष्ट्र उभारायचे असेल तर शिक्षण हे मूल्याधारित असले पाहिजे." - आजची शिक्षणपद्धती फक्त नोकरी मिळवण्यासाठी तयार करते. पण राष्ट्रासाठी अशा शिक्षणाची गरज आहे जे नागरिकांचे सामाजिक भान आणि जबाबदारी निर्माण करते.
- नानाजी देशमुख
नानाजींच्या अनेक आठवणी आहेत. अनेक लोकांचे वेगवेगळे अनुभव आहेत. त्यातील काही आठवणी देत आहे.
नानाजींना वेळेचे फार महत्त्व होते. त्यांना ज्यावेळेस उठायचे असेल त्यावेळेस त्यांना बरोबर जाग येत असे. एकदा ते परळीला गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी गेले होते. त्यांची राहण्याची व्यवस्था डाक बंगल्यात केली होती. पण नानाजी त्यांच्या नातीकडे राहायला गेले. त्यांची अशी पद्धत होती की ते ज्या गावी जात तिथे त्यांचे कोणी नातेवाईक राहत असतील तर ते त्यांच्याकडे राहायला जात. नातीने नानाजींची झोपायची व्यवस्था गच्चीवर केली होती. नानाजींना नैसर्गिक वातावरणात झोपायला खूप आवडत असे. खूप दिवसांनी भेटल्यामुळे रात्री गप्पा रंगल्या, व झोपायला उशीर झाला. नानाजींना सकाळी साडेपाच वाजता प्रचारासाठी निघायचे होते. नातीला वाटले झोपायला उशीर झाला आहे तर आपण लवकर कसे उठणार म्हणून तिने गजर लावून ठेवला. सकाळी ती नानाजींना उठवायला गच्चीत गेली तर तिला खूप आश्चर्य वाटले नानाजी उठून अंथरुणावर बसलेले होते. नानाजी तिला म्हणाले, "रात्री झोपायला कितीही उशीर झाला, तरी मी ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस बरोबर उठतो."
नानाजींचा स्वभाव दुसऱ्यांना कायम मदत करण्याचा होता. ते आपल्या मित्रांना, नातेवाईकांना व कार्यकर्त्यांना नेहमी अडीअडचणीला मदत करीत. जयप्रकाश नारायण यांच्या पत्नी प्रभावती देवी यांना कर्करोग झाला होता. अगदी शेवटची अवस्था होती. त्या बऱ्या होणार नाहीत हे पक्के होते. पण तरीही माणसाची आशा असते म्हणून त्यांना मुंबईला टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नेण्याचे ठरविले पण तिथे खोली उपलब्ध नव्हती. नानाजींना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी त्यांचे मित्र जे डी चोक्सी यांना फोन केला. चोक्सी हे टाटा रुग्णालयाचे 'व्यवस्थापकीय व्हाईस चेअरमन' होते. शेवटी त्यांच्या मदतीने एक खोली मिळाली. नानाजींनी प्रभावती देवी यांची मनापासून शेवटपर्यंत सेवा केली.
लहानपणी नानाजींना त्यांच्या मोठ्या बहिणींनी सांभाळले होते. याची जाणीव ठेवून नानाजींनी त्यांच्या दोन्ही मोठ्या बहिणींची अत्यंत प्रेमाने सेवा केली होती.
नानाजींनी लग्न केले नव्हते पण ते अतिशय कुटुंब वत्सल होते. भावंडे, भाचे, भाचेसुना, पुतण्या यांचे कौतुक ते नेहमी करत. त्यांच्या घरी सुखदुःखाच्या वेळी उपस्थित रहात. नानाजी यांची नात सुरेखा देशमुख हिला नानाजींनी अनेक वेळा सल्ला दिला आहे. चांगल्या हस्ताक्षराबद्दल नानाजींचा कटाक्ष असे. ते सुरेखाला नेहमी सांगत, "अक्षर सुवाच्य व वळणदार असावे. वेलांटी, काना, मात्रा, योग्य प्रमाणात असाव्यात." हे वाचले की समर्थांची आठवण होते. समर्थ रामदासांनी 'लेखन क्रिया' या विषयावर एक समास दासबोधात लिहिला आहे. नानाजी आपल्या नातीला सांगत, "पत्र लिहिण्यास आळस करू नये, किंवा वेळ लावू नये" . त्याकाळी फोन नव्हते, पत्रांमधूनच एकमेकांची चौकशी केली जायची. त्यामुळे नानाजींचा पत्र लिहिण्यावर भर होता. ते म्हणत पुस्तक वाचल्यावर टिपणे काढावीत, निरीक्षणे लिहावीत. हे महत्त्वाचे आहे. नानाजींना वृद्धापकाळी जेव्हा खोली बाहेर पडणे अशक्य झाले तेव्हा त्यांनी आपल्या मित्रांना, व कार्यकर्त्यांना अनेक पत्रे लिहिली.
नानाजींच्या आईने नानाजी दीड वर्षाचे असताना आत्महत्या केली. त्यामुळे त्यांना आईचे प्रेम मिळाले नाही. त्यांच्या बहिणी लक्ष्मीबाई व मैनाबाई यांनी त्यांना सांभाळले म्हणून नानाजींना त्यांच्याबद्दल विशेष जिव्हाळा होता. त्यांच्या मनात बहिणींविषयी कृतज्ञता होती. एकदा त्यांचा भाचा सुभाष बाऱ्हाळे एकटाच चित्रकूटला आला. नानाजींना खूप आनंद झाला. पण त्यांनी त्याला विचारले, "आईला का आणले नाहीस? ती आली असती तर मला विशेष आनंद झाला असता. माझ्या मोठ्या बहिणी मला आई समान आहेत." हे शब्द सुभाष यांनी लक्षात ठेवले व नंतर पुढल्या वेळी तो आपल्या आईला घेऊन चित्रकूटला आला. नानाजींना अत्यंत आनंद झाला. त्यांनी आपल्या बहिणीला व्हीलचेअरवर बसवून संपूर्ण चित्रकूटचा परिसर दाखवला.
लेफ्टनंट कर्नल डॉक्टर राघवेंद्र जोशी यांना नानाजींच्या बद्दल खूप आदर व श्रद्धा होती. ते म्हणतात, "एकदा मी आणि माझी पत्नी औरंगाबाद येथे माझ्या मित्राच्या घरी नानाजींना भेटायला गेलो. नानाजींच्या कर्तृत्वाबद्दल मी खूप ऐकले होते. त्यांचे राजकारणातील कार्य व त्यांनी उभारलेले चित्रकूट, गोंडा प्रकल्प याबद्दल मी खूप काही वाचले होते. मला त्यांना भेटायची आत्यंतिक इच्छा होती व तो योग जुळून आला. मी जेव्हा माझ्या मित्राच्या घरी नानाजींना भेटायला गेलो तेव्हा मला आश्चर्य वाटले. नानाजी सोफ्यावर बसले होते. त्यांच्या आजूबाजूला सर्व बालगोपाल मंडळी गोष्टी ऐकायला बसली होती. तेव्हा मला नानाजी एका ज्ञानवृध्द, वयोवृद्ध तप:पूत ऋषींप्रमाणे भासले. त्यांच्या डोळ्यातून वात्सल्य ओसंडून वाहत होते हे पाहून ते मला आजोबा पणजोबा यांच्यासारखे वाटले. मी त्यांच्यावर एक कविता व पोवाडा केला होता. तो मी त्यांना ऐकवला."
कुमुद सिंह या नानाजींची मानसकन्या. नानाजींनी त्यांच्या पश्चात जी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती ती पूर्ण करण्याची जबाबदारी कुमुद सिंह यांच्यावर सोपवली होती. कुमुद सिंह नानाजींच्या आठवणी सांगताना म्हणतात, "नानाजींनी मला घडविले आहे. १९६० सालापासून मी नानाजींबरोबर होते. माझे पती श्रीकांत यांना दम्याचा त्रास होता. नानाजी मला म्हणाले, मी तुझ्या पतीला बरे करण्याची जबाबदारी घेतो. तू माझी जबाबदारी घे. नानाजींनी चांगल्या डॉक्टरला दाखवून माझ्या पतीवर चांगले इलाज केले. त्यांनी माझ्यावर 'दीनदयाळ शोध संस्थान'च्या आल्या गेल्या लोकांची देखरेख करण्याची जबाबदारी सोपवली. नानाजींना अनेक लोक भेटायला येत. त्यांचे जेवण बनवणे, त्यांना खायला देणे, त्यांच्या खोल्या साफ करणे ही सर्व कामे मी करत असे."
नानाजी म्हणत, "माणसाने काम करावे, कष्ट करावेत. बसून राहिल्याने माणूस थकतो. काम करीत राहिल्याने माणूस उत्साही राहतो." या म्हणण्याप्रमाणे ते स्वतः वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत कार्यरत होते. कुमुद सिंह पुढे म्हणतात, "नानाजींनी मला महाराष्ट्रातील खास पदार्थ जसे की पिठले, थालीपीठ, पुरणपोळी, पोहे बनवायला शिकवले. आलेल्या लोकांना जेऊ घालणे महत्त्वाचे आहे." मी नानाजींना म्हणत असे, "तुम्ही सर्वजण देशासाठी, समाजासाठी किती करता, मी काहीच करत नाही." तेव्हा ते मला म्हणाले, "तू आलेल्या लोकांना जेवू घालतेस म्हणजे अप्रत्यक्षरीत्या देशसेवाच करतेस."
नानाजी यांनी त्यांच्या नवनिर्माणाच्या कार्यकाळात अनेक परदेश दौरे केले. हे दौरे आधुनिक तंत्रज्ञान आणि उपयुक्त माहिती गोळा करण्यासाठी तसेच भारतातील ग्रामविकास कामासाठी मार्गदर्शन मिळवण्यासाठी केले होते. त्यांनी विविध देशांना भेट दिली, ज्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, क्यूबा, कॅनडा, जर्मनी, कोरिया, जपान, हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड, मेक्सिको आणि केनिया यांचा समावेश आहे.