"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"गायी भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत." - देशी गोवंश हे केवळ दूधासाठी नसून शेती, खत, गोबर गॅस, औषधे आणि संपूर्ण ग्रामजीवनासाठी अपरिहार्य आहेत. गायींवर आधारित शेती म्हणजेच जैविक जीवनशैली.
- नानाजी देशमुख
१९७८ ते १९९० अशी बारा वर्षे नानाजी गोंडा प्रकल्पात कार्यरत होते. नंतर तो प्रकल्प यशस्वी होऊन मार्गी लागल्यावर त्यांनी 'चित्रकूट' प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. नानाजी एक कार्य हाती घेतले की ते पूर्ण करत. मगच दुसऱ्या कार्याकडे वळत. ते कधीही कुठेही अडकून पडले नाहीत. वयाच्या साठाव्या वर्षी राजकारणात मंत्रिपद मिळत असतानाही ते नाकारून नानाजी गोंडा प्रकल्पाकडे वळले. वयाच्या ७५ व्या वर्षी गोंडा प्रकल्पातून बाजूला होऊन त्यांनी चित्रकूट प्रकल्प सुरू केला. याचवेळी त्यांनी वेगवेगळ्या संस्थांमधल्या पदाचा राजीनामा दिला. ते म्हणाले, "यापुढे मी केवळ स्वयंसेवक असेन." वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी आपला देह दान करण्याचा विचार केला. एवढेच नव्हे तर त्यासाठी दहा हजार रुपये बाजूला काढून ठेवले. देशाच्या कल्याणासाठी निरलस सेवा करणारा हा तपस्वी खरोखरच अद्वितीय होता.
गोंडा प्रकल्पाचे काम चालू असताना चित्रकूट येथील 'अनसूया आश्रमा'चे महंत भगवानानंद स्वामी यांनी नानाजींना सांगितले की तुमच्या कार्याची चित्रकूटला गरज आहे आणि त्याकरता माझ्या आश्रमाची १७० एकर जमीन मी तुम्हाला द्यायला तयार आहे. चित्रकूटचे निसर्ग सौंदर्य, आध्यात्मिक महत्त्व यांचा नानाजींच्या मनावर पगडा होताच. ते रामभक्त होतेच व जमीनही मिळाली. मग नानाजींनी 'चित्रकूट प्रकल्पा'च्या आखणीला सुरुवात केली.
चित्रकूट हे स्थान मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश यांच्या सीमेवर आहे. म्हणजे चित्रकूट मधूनच या दोन राज्यांची सीमा जाते. चित्रकूट प्राचीन काळापासून तपोभूमी आहे. श्रीराम जेव्हा वनवासाला गेले तेव्हा त्यांनी बराचसा काळ चित्रकूट येथे व्यतीत केला असे वाल्मिकी रामायणात म्हटले आहे.
नानाजी १२ फेब्रुवारी १९९१ रोजी चित्रकूटला आले. तिथे येण्याच्या अगोदर त्यांनी नेहमीप्रमाणे चित्रकूटच्या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास केला होता. चित्रकूट येथील जमीन फारशी चांगली नव्हती. तिथे डाकूंची समस्या होती. एके दिवशी नानाजी रात्री दहा वाजता शेतावर गेले. त्या रात्री डाकूंची सशस्त्र टोळी तिथे आली. नानाजींनी त्यांचे स्वागत केले. त्यांना खायला प्यायला दिले. नानाजी त्यांना म्हणाले, "इथले अन्नधान्य आम्ही आदिवासी मुलांना देऊ. संस्थानिकांना देणार नाही." डाकू नानाजींना म्हणाले, "असे असेल तर आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही." नानाजी म्हणत, “डाकू मुळात वाईट नसतात. ते पण इथलेच आहेत. समाजातील विषमतेमुळे, परिस्थितीमुळे ते डाकू झालेले असतात.” हळूहळू डाकूंना नानाजींच्या कार्याचे महत्व पटले व त्यांचा उपद्रव कमी झाला.
एकदा एक 'समाज शिल्पी दांपत्य' श्री राजेन्द्र व सौ. मंजू सिंह यांचे डाकूंनी अपहरण केले. मंजु सिंह यांना हा मोठा धक्का होता. त्या बेशुद्ध पडल्या. तेव्हा डाकूंनी त्यांना जंगलात सोडून दिले. राजेंद्रला मात्र त्यांनी डोंगर दऱ्यातून चालवत नेऊन आपल्या प्रमुखासमोर उभे केले. प्रमुखाने मोठ्या खंडणीची मागणी केली. राजेंद्र अजिबात डगमगले नाहीत. राजेंद्र जेव्हा 'नानाजींसाठी काम करतो' असे म्हणाले, तेव्हा तो प्रमुख म्हणाला, "माझ्यावर लहानपणी कोणी चांगले संस्कार केले असते तर मी डाकू झालो असतो का?" नंतर त्यांनी राजेंद्रचा सत्कार केला. त्याची मिरवणूक काढली व त्याला गावात आणून सोडले. यानंतर त्यातल्या काही डाकूंनी आपली शस्त्रे खाली ठेवून समर्पण केले व ते चांगल्या मार्गाला लागले.
गोंडा प्रकल्पाप्रमाणे या प्रकल्पातही नानाजींनी शिक्षण, आरोग्य, पाणी व शेती या मूलभूत गोष्टींवर भर दिला. या सर्व कार्यासाठी निधी उभारणे सर्वात महत्त्वाचे होते. थोर उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांनी पाच कोटी रुपये देणार म्हणून कबूल केले. पण दुर्दैवाने त्यांचे लगेच निधन झाले. त्यांचा पुतण्या रतन टाटा यांनी नानाजींना या कार्यासाठी पाच कोटी रुपये दिले. प्रसिद्ध उद्योगपती रामनाथ गोयंका यांनीही बरेच आर्थिक सहाय्य केले.
१९६९ साली भारतीय जनसंघाचे पहिले अधिवेशन पाटणा येथे भरले होते. तेव्हा नानाजी प्रथम चित्रकूटला आले होते. अत्री ऋषी, त्यांची पत्नी अनसूया, श्रीरामप्रभू, गोसावी तुलसीदास येथे राहून गेले होते. म्हणून चित्रकूट ही पावन भूमी होती. राजापूर येथे संत तुलसीदास यांच्या हस्ताक्षरातील 'रामचरितमानस' ची काही पाने जतन करून ठेवली आहेत. चित्रकूट परिसर म्हणजे मंदाकिनी नदीच्या खोऱ्याचा परिसर आहे.
१९९१ साली नानाजी चित्रकूटचा विकास करण्याच्या दृष्टीने तिथे आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्याचा उर्वरित काळ चित्रकूट येथे व्यतीत केला. 'चित्रकूट - राम दर्शन - नानाजी' असे समीकरणच होऊन गेले. खरंतर यावेळी नानाजी ७३ वर्षांचे होते. पण त्यांचा उत्साह आणि जोमाने काम करण्याची इच्छा एखाद्या तरुणाला लाजवील अशी होती.
ग्रामोदय हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश! त्याचबरोबर पर्यावरणाचे संतुलनसुध्दा राखले गेले पाहिजे, म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाशी सुसंगत असा प्रकल्प हवा असे नानाजींचे ठाम मत होते .
नानाजींनी सुरुवात केली 'सियाराम कुटीर'च्या बांधणी पासून. स्वतःच्या निवासाकरता नानाजींनी ही वास्तू उभारली. त्यात त्यांचे कार्यालय, पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था, सचिव व इतर काही लोकांची निवासाची व्यवस्था आहे. नानाजींची कलात्मक दृष्टी सियाराम कुटीरच्या बांधणीत दिसून येते. प्रवेश केल्या केल्या एक पुष्करणी आहे व त्यात एक उघडलेला शिंपला. त्या शिंपल्यातून बाहेर आलेला डॉक्टर हेडगेवार यांचा अर्ध पुतळा आपले लक्ष वेधून घेतो. कुटीरातल्या हॉलमध्ये भारतमातेचा पुतळा आहे. सियाराम कुटीराच्या मागच्या बाजूला मंदाकिनी नदी वाहत आहे. नदीच्या किनाऱ्यावर रामनाथजी गोयंका यांच्या स्मरणार्थ एक घाट बांधलेला आहे. तिथे रामनाथजींचा भव्य पुतळा आहे. भिंतीवर देवदेवता व ऋषीमुनींच्या मूर्ती आहेत. जवळच राम, लक्ष्मण व सीता यांचे शिल्प उभे केले आहे.
नदीच्या दुसऱ्या तीरावर 'जे. आर. डी. टाटा आरोग्यधाम'ची वास्तु मोठ्या दिमाखात उभी आहे. आरोग्यधामचे काही कक्ष उंच टेकडीवर आहेत. नैसर्गिक जमिनीत कुठेही फेरफार न करता सर्व बांधकाम केले आहे. या आरोग्यधाम मध्ये प्रवेश करताना प्रथम एक मोठे स्वच्छ तळे दिसते, त्याचे नाव आहे 'वैशाली'.
आरोग्यधाम मध्ये 'निदान सदन', 'योग विज्ञान सदन', 'आहार विहार सदन' असे वेगवेगळे भाग आहेत. निवासी डॉक्टरांना राहण्यासाठी घरे बांधली आहेत. इथे आयुर्वेदिक औषधांवर भर दिला जातो. त्यामुळे औषधी वनस्पती वाढविण्यासाठी एक बाग आहे. या बागेत फुलझाडे, फळझाडे, भाजी व औषधी वनस्पती यांची लागवड केली जाते. औषधी वनस्पतींवर संशोधन करण्यासाठी जे छात्र येतात त्यांच्यासाठी एक वसतिगृह बांधले आहे. याशिवाय वैद्यकीय पुस्तकांचे सर्व 'पॅथीं'चे संदर्भ ग्रंथ असलेले एक अद्ययावत ग्रंथालय इथे आहे. या ग्रंथालयात देश विदेशातून डॉक्टर येतात. त्यांची व्याख्याने व चर्चासत्रे इथे होतात.
गोंडा प्रकल्पाप्रमाणेच इथेही 'आजीबाईचा बटवा' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. अनुभवी वैद्य व दाया यांचा उपयोग करून रोग्यांना औषधे दिली जातात. जुन्या दायांना नवीन तंत्रज्ञान शिकवून नव्या जुन्याचा समन्वय राखला आहे. आरोग्यधामामुळे आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांचा खूप फायदा झाला आहे. कमी खर्चात त्यांना औषधे मिळू लागली आहेत. जेव्हा रुग्णाबरोबर काही नातेवाईक येतात तेव्हा त्यांच्या निवासाची सोय 'स्वास्थ्य कुटीर' मध्ये केली आहे .
चित्रकूटच्या आजूबाजूला डोंगराळ भाग आहे. तिथे अनेक वनौषधी आहेत. त्या गोळ्या करून 'चित्रकूट रस शाळे'मध्ये अनुभवी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आयुर्वेदिक औषधे तयार केली जातात. काही वनस्पती आवारात लावल्या आहेत. या सगळ्यांचा उपयोग करून भस्म, भुकट्या, तेल, च्यवनप्राश इत्यादी तयार केले जाते. वनवासी लोकांना औषधी वनस्पतींचे ज्ञान आहे त्याचा उपयोग केला जातो. जे लोक अशा 'जडीबुटी' गोळा करून आणतात त्यांना योग्य तो मोबदला दिला जातो. म्हणजे त्यांच्या चरितार्थाची सोय केली जाते.
भारतीय परंपरेत गाईंना फार महत्त्व आहे. 'गीता प्रेस'चे भूतपूर्व संपादक श्री. हनुमान प्रसाद पोद्दार यांच्या नावाने एक 'गोवंश विकास प्रकल्प' सुरू केला आहे. दालमिया बंधूंनी यासाठी निधी दिला. गाईचे दूध हे पूर्णान्न आहे. गोमूत्र औषधी आहे तर गाईचे शेण खत म्हणून उपयोगी पडते. शेण व गोमूत्र यांनी सारवलेल्या जमिनीवर कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही. गाई दूध जास्त कशा देतील? त्यांना कोणते खाद्य द्यावे? यावर इथे प्रयोग सुरू आहेत.
नानाजी शिक्षणाचा संबंध कुटुंब व समाज याबरोबर जोडतात. आदिवासी मुलांना शिक्षण मिळावे या हेतूने चित्रकूटला सुरेंद्र पाल यांच्या स्मरणार्थ एक विद्यालय बांधण्यात आले आहे. प्रसिद्ध उद्योगपती स्वराज्य पाल यांनी यासाठी आर्थिक सहाय्य दिले. सुरेंद्र पाल यांच्यावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता. त्यांचा अकाली मृत्यू झाला परंतु त्यांच्या दोन भावांनी शाळा बांधण्यासाठी व चालवण्यासाठी मदतीचा हात पुढे केला.
ही शाळा एक 'आदर्श शाळा' आहे. पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण इथे दिले जाते. अभ्यासाव्यतिरिक्त व्यायाम, बागकाम, गायन, वादन, चित्रकला, मूर्तिकाम, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे अशा अनेक कला इथे शिकविल्या जातात. मुलांची वाचनाची आवड वाढावी त्यांनी चतुरस्त्र ज्ञान मिळवावे या हेतूने एक ग्रंथालय स्थापन केले आहे. त्यात विविध विषयांवरची पुस्तके ठेवलेली आहेत. मुलांना सूर्यनमस्कार व योगासने शिकविली जातात. शाळेच्या सहली काढल्या जातात.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुलांना 'उद्योमिता विद्यापीठात' रोजगार मिळू शकेल असे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना काही काम दिले जाते व त्याबद्दल मोबदला दिला जातो. हे पैसे पोस्टात त्यांच्या खात्यावर जमा केले जातात यामुळे मुलांना स्वकष्टाने पैसे मिळवण्याचा आनंद मिळतो. मी काही करू शकतो / शकते ही भावना निर्माण होऊन आत्मविश्वास वाढतो व बचतीची सवय अंगी बाणते.
इसवी सन २००० मध्ये 'गुरुकुलम' हा नवीन प्रकल्प सुरू केला आहे. यात मुलींसाठी चार व मुलांसाठी सहा गुरुकुले अशी व्यवस्था केली आहे. प्रत्येक गुरुकुलात चार खोल्या विद्यार्थ्यांसाठी, एक कुलगुरूंसाठी, तसेच स्वयंपाक घर, भोजनकक्ष, स्नानगृह इत्यादी सोयी आहेत. प्रत्येक गुरुकुलाचे शिक्षक तिथे राहतात. त्यांना 'दंपती पालक' म्हणतात. ते विद्यार्थ्यांची आईवडिलांप्रमाणे काळजी घेतात. त्यांच्यावर संस्कार करतात. मुलांच्या सहली आयोजित केल्या जातात. दर चारपाच महिन्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून शिबिर आयोजित केले जाते.
वनवासी मुला मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांच्यासाठी 'आश्रम शाळा' सुरू केल्या आहेत. मुलींसाठी 'कृष्णा देवी वनवासी बालिका आश्रम' मझगवा (मध्य प्रदेश) इथे सुरू केला आहे. यामुळे मुलींमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढले असून बालविवाहाचे प्रमाण कमी झाले आहे. मुलांसाठी 'रामनाथ आश्रम शाळा' गुरुकुल पद्धतीने चालविली जाते. या सर्व कार्यामुळे आदिवासी मुलामुलींच्या विचारात बदल झालेला दिसून येतो. ही शाळा निशुल्क आहे. मुलांच्या राहण्याची व जेवण्याची सोय झाल्यामुळे गरीब, दारिद्र्यरेषेखाली असणारे पालक आपल्या मुलांना इथे पाठविण्यास तयार असतात. इथे शिक्षण घेऊन मुले स्वावलंबी होतात. त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यात पण मदत होते.
१९९० ते २००० मध्ये गनिंवा (मध्य प्रदेश) इथे 'परमानंद आवासी हरिजन विद्यालय' सुरू करण्यात आले. इथे फक्त मुलामुलींना शिकवले जात नाही तर त्यांच्या आईवडिलांना कुटीर उद्योगाचे प्रशिक्षण दिले जाते. या शाळेत कॉम्प्युटरचे शिक्षणही दिले जाते. ही शाळा चित्रकूट पासून ३५ - ४० किलोमीटर अंतरावर आहे.
'भारतातील खेड्यांचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत भारताचा विकास होणार नाही' हे सर्वच विचारवंतांचे मत होते. महात्मा गांधींना पण हेच अभिप्रेत होते. म्हणून नानाजींनी गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी गांधींच्या नावाचे पहिले विद्यापीठ स्थापन केले. त्याचे नाव 'महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय'. या विश्वविद्यालयाची उद्दिष्टे अशी होती की मुलांनी स्वावलंबी व्हावे. 'कमवा व शिका' हा इथला मंत्र. ग्रामोद्योग व व्यावसायिक शिक्षणावर इथे भर दिला जातो. मुलांच्या गुणांना वाव मिळेल अशी शिक्षणाची रचना करण्यात आली आहे. पारंपरिक शिक्षण न देता मुलांना पुढच्या आयुष्यात चरितार्थ चालवणे सोपे जाईल असे शिक्षण इथे देण्यात येते. या विश्वविद्यालयाचे बोधवाक्य आहे 'विश्व ग्रामे प्रतिष्ठितम्'. या विद्यापीठात २२ विभागांमध्ये ८० विषयांचा अभ्यास केला जाऊ लागला आहे. त्या काळचे म्हणजे १९९१ सालचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री सुंदरलाल पटवा यांनी नानाजींना या विद्यापीठाचे 'कुलगुरू' व्हावे म्हणून गळ घातली व नानाजींनी ती मान्य केली. सुरुवातीला सरकारकडून या विद्यापीठाला आर्थिक मदत होत होती. नंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले व ही आर्थिक मदत कमी प्रमाणात मिळू लागली. यामुळे कर्मचारी व प्राध्यापक यांचे पगार देण्यासाठी बँकेकडून लाखो रुपयांची कर्जे काढावी लागली. नानाजींना तेव्हा असे वाटले की ते जोपर्यंत कुलगुरू आहेत तोपर्यंत विद्यापीठाची अशीच आर्थिक कोंडी होणार. तेव्हा त्यांनी १९९५ मध्ये कुलगुरू पदाचा राजीनामा दिला. नानाजी म्हणतात,
"जेव्हा संस्थेसाठी व्यक्ती ही अडचण ठरते, तेव्हा व्यक्तीने आपला स्वतःचा विचार बाजूला ठेवून संस्थेचे हित जपले पाहिजे."
नानाजींनी तेच केले. आजही हे विद्यापीठ चालू आहे, पण त्याची धोरणे बदलली आहेत. कालाय तस्मै नमः!
चित्रकूट इथली जमीन नापीक, पाण्याचे दुर्भिक्ष म्हणून तरुण शहराकडे जातात ही सर्वसाधारण परिस्थिती. यावर उपाय म्हणून नानाजींनी इथे 'उद्यमिता विद्यापीठ' स्थापन केले. इथे शेतीला जे पूरक व्यवसाय आहेत त्यांचे शिक्षण तरुणांना दिले जाते. सगळ्यांना गावातच रोजगार मिळावा, कोणीही बेकार राहू नये हा यामागचा हेतू.
याशिवाय कृषी संवर्धनासाठी कृषी विज्ञान केंद्रे स्थापन करण्यात आली. ही सर्व ICAR यांच्या अंतर्गत कृषी मंत्रालयाच्या द्वारे चालवली जातात. भारतात 'हरितक्रांती' झाली हे बरोबर आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आखते. याची माहिती या केंद्राकडून अगदी लहानात लहान शेतकऱ्यांपर्यंत पुरवली जाते. जलसंवर्धन, जैविक शेती, बायोडिझेलची निर्मिती, संशोधित बियाणे निर्माण करणे, शेतीचे उत्पादन वाढवणे, असे बहुविध उद्देश या केंद्राचे आहेत.
अशा प्रकारे नानाजींनी चित्रकूट व आसपासच्या परिसरात संपूर्णपणे परिवर्तन घडवून आणले. देश विदेशातून त्यांचे काम पाहण्यासाठी लोक येऊ लागले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर या कामाची दखल घेतली गेली. १९९९ मध्ये राष्ट्रपती द्वारा सन्माननीय राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९९९ मध्येच राष्ट्रपती द्वारा 'पद्मविभूषण' पुरस्काराने नानाजींना सन्मानित करण्यात आले.