"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"ग्रामोदयातून भारतोदय घडवता येतो." - गोंडा आणि चित्रकूटमधील माझ्या प्रयोगांनी सिद्ध केले की, जर ग्रामविकास सेंद्रिय, लोकसहभागी आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य असेल, तर त्यातून संपूर्ण राष्ट्राचे पुनरुज्जीवन शक्य आहे.
- नानाजी देशमुख
नानाजींच्या मनात रामराज्य साकार करायचे होते, एक आदर्श गाव स्थापन करायचे होते. जिथे आरोग्य, पाणी, शेती, शिक्षण, उद्योग, शिशु कल्याण केंद्र, सर्वकाही असेल. माणसाच्या ज्या किमान गरजा आहेत, त्या भागल्या पाहिजेत. माणूस 'आत्मनिर्भर' व्हायला पाहिजे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. कृषी, शिक्षण आणि आरोग्य या तीन गोष्टींवर मुख्य भर देऊन ग्रामीण लोकांचे जीवन स्वावलंबी व्हावे हे नानाजींचे स्वप्न होते आणि हे भारतीय परंपरेवर आधारलेले होते. प्रत्येक गोष्ट आपल्या वातावरणाला जी योग्य आहे तशी असली पाहिजे असे त्यांचे मत होते. कारण पाश्चात्यांचे अनुकरण करून आपला विकास होणार नाही हे त्यांना पटले होते. आपली भौगोलिक, सामाजिक परिस्थिती वेगळी आहे म्हणून आपला जो शाश्वत विकास होईल तो आपल्या परंपरांना अनुसरूनच, हे ते जाणत होते.
गोंडा या ठिकाणापासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर त्यांनी एक गाव वसवले. जयप्रकाश नारायण यांचे तत्त्वज्ञान या सर्व समाजकारणामागे होते. जयप्रकाश यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'जय' आणि जयप्रकाश यांच्या पत्नी प्रभावती यातील 'प्रभा' ही अक्षरे घेऊन या नवीन गावाचे नाव 'जयप्रभा ग्राम' असे ठेवले. याचा उद्घाटन समारंभ २५ नोव्हेंबर १९७८ रोजी तत्कालीन राष्ट्रपती श्री नीलम संजीव रेड्डी यांच्या हस्ते पार पडला. या समारंभाला संघाचे सरसंघसंचालक बाळासाहेब देवरस हेही उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी नानाजींना विचारले, "या दोन महत्त्वाच्या पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था कुठे करायची?" नानाजी म्हणाले, "जी सर्वांसाठी व्यवस्था आहे, तीच अतिथींसाठी." त्या दिवशी बाळासाहेब देवरस व राष्ट्रपती आदिवासी लोकांबरोबर जमिनीवर बसून द्रोण व पत्रावळ यात जेवले. सर्वसमावेशकता व समानता याचा धडा इथे मिळतो. या उद्घाटन समारंभानंतर गावाचा विकास करण्यात आला.
गोंडा जिल्हा विस्ताराने मोठा होता. संपूर्ण जिल्ह्यात योजना राबवायची म्हणजे स्वयंसेवकांची एक फळी निर्माण करणे आवश्यक होते. इथे नानाजींनी एक अभिनव मार्ग अवलंबिला. त्यांनी 'समाज शिल्पी दांपत्य' ही कल्पना मांडली. तरुण विवाहित जोडप्यांनी कार्य करण्यासाठी पुढे यायचे व समाजकार्य करावयाचे. या तरुण जोडप्याला यामुळे चरितार्थ चालविण्याइतके पैसे मिळतील व समाजकार्य पण पुढे नेले जाईल. नानाजींनी अशा तरुण विवाहित दांपत्यांना आवाहन केले. काही जोडपी पुढे आली. तरुणांनीही उत्तम प्रतिसाद दिला. प्रत्येक तरुणाला पंधरा छोटी खेडी देण्यात आली. हे कार्यकर्ते सर्व गावात जात, गावकऱ्यांशी चर्चा विनिमय करीत, नवीन योजना त्यांना समजावून सांगत व त्यांच्याच सहकार्याने गावात परिवर्तन घडवून आणत. सरकार चांगल्या योजना आदिवासी लोकांसाठी, वंचितांसाठी, शेतकऱ्यांसाठी तयार करते. पण त्या योजना या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत हीच मोठी समस्या आहे. हे तरुण कार्यकर्ते ग्रामस्थांना सर्वतोपरी मदत करत व एकदा त्यांना कार्यकर्त्याबद्दल विश्वास वाटू लागला की काम सोपे होऊन जाई. अशा व्यक्तिगत संपर्कातून संघटन झाले. त्यातून गावकरी कार्यात सहभागी झाले व प्रकल्प यशस्वी झाला.
जयप्रभा ग्राम च्या जवळ 'गोपाल ग्राम' येथे १९८९ मध्ये नानाजींनी 'कृषी विज्ञान केंद्रा'ची स्थापना केली. त्याचे नाव 'लाल बहादूर कृषी विज्ञान केंद्र' असे ठेवले. या केंद्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. शेतकऱ्याला वर्षातून दोनतीन पिके कशी घ्यायची याचे प्रशिक्षण दिले जाते. मातीची तपासणी करणे, कोणते खत वापरावे? कोणते पीक घ्यावे? हे शेतकऱ्यांना सांगितले जाते. याचबरोबर किसान मेळावे भरवणे, तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रेरणा देणे, शेतावर नवीन प्रयोग करणे, त्या प्रयोगांना प्रसिद्धी देणे, अशी कामे हे कृषी विज्ञान केंद्र करते. शेती करण्यासोबत दुसरे व्यवसाय करणे शेतकऱ्याला शक्य आहे. डेअरी, कुक्कुट पालन, मधमाशा पाळणे, शेळ्या पाळणे, पशुपालन असे व्यवसाय व त्यांची माहिती शेतकऱ्यांना देणे, हे कामही या केंद्रामार्फत केले जाते. दुग्ध व्यवसाय करायचा असल्यास गाईची काळजी कशी घ्यावी, त्यांना कोणते खाद्य द्यावे म्हणजे दूध उत्पादन वाढेल याचे मार्गदर्शन याच केंद्रात केले जाते. जैविक खते कशी तयार करावीत याचे प्रशिक्षण पण शेतकऱ्यांना दिले जाते.
नानाजींनी जयप्रभाग्राम कलात्मकरीत्या वसविले. गावात सर्व सुख सोयी तर होत्या, पण त्याचबरोबर निसर्गाचे संवर्धन कसे होईल याची काळजीही घेतली गेली. पाण्याच्या साठवणीकरता त्यांनी एक सुंदर तलाव बांधून घेतला. त्याचे नाव 'मानस झील' असे ठेवले. या तलावाची वास्तुरचना नानाजींनी स्वतः केली. तलावाच्या बाजूला कठडे आहेत त्यामुळे बाजूची माती तलावात जात नाही. दोन बाजूला तलावात उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत. तलावाच्या भोवती निरनिराळी झाडे लावली आहेत. काही फुलझाडे आहेत. तलावात बगळे, बदके इत्यादी पाणपक्षी आहेत. नौका विहाराची सोय केलेली आहे. अत्यंत रमणीय स्थळ निर्माण झाले आहे. त्यामुळे बालगोपाल व वृद्ध इथे येऊन आपला वेळ मजेत घालवितात. तलावावर पूल बांधला आहे. बाजूला छोट्या कुट्या बांधल्या आहेत. नानाजींचा मुक्काम इथे आल्यावर एका बांबूच्या कुटीत असायचा. कुट्यांच्या दर्शनी भागात डॉक्टर हेडगेवार, पंडित दीनदयाळ उपाध्याय, गोळवलकर गुरुजी यांचे पुतळे आहेत. अशा रम्य परिसरात लोक प्रसन्नतेचा अनुभव घेऊन, ताजेतवाने होऊन, दुप्पट जोराने काम करण्यास तयार होतात. नानाजींना आदर्श गाव निर्माण करावयाचा होता. निसर्गाचे संतुलन राखून गावात सोयी उपलब्ध करून द्यायच्या होत्या.
जयप्रभा ग्रामच्या परिसरात 'रामनाथ आरोग्यधाम'ची स्थापना केली आहे. इथे आयुर्वेदाला महत्त्व आहे. आत्तापर्यंत अनेक मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया येथे केल्या गेल्या. डोळ्यांच्या आरोग्यासाठी शेवगा अत्यंत उपयोगी आहे म्हणून बागेत शेवग्याची झाडे लावली आहेत. या आरोग्यधामात फक्त उपचारच करीत नाहीत, तर लोकांमध्ये आरोग्यासंबंधी जागरूकता निर्माण केली जाते. इथल्याच परिसरात औषध निर्माणही केले जाते. येथील रसशाळेत अनेक प्रकारची औषधे तयार केली जातात.
भारतात पूर्वीपासून घरगुती औषधे घेण्याची पद्धत होती. बहुतेक घरात 'आजीबाईचा बटवा' असायचा व त्यात छोट्यामोठ्या आजारासाठी औषधे असत. हीच पद्धत इथल्या गावात सुरू केली आहे. गावात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला औषधांचे जुजबी ज्ञान देऊन त्याला एक पेटी दिली जाते. या पेटीत काही आयुर्वेदिक औषधे, भस्म, चूर्ण, तेल इत्यादी ठेवलेले असते. रोग्याकडून नाममात्र फी एक रुपया घेऊन त्याला औषध दिले जाते. अशी ही योजना - 'आजीबाईचा बटवा'.! कार्यकर्ते मधून मधून या पेटीत जी औषधे संपली असतील, ती भरतात. औषधी वनस्पतींची लागवड गावातच केली जाते. ही औषधे स्वस्त तर आहेतच पण त्यांचे दुष्परिणामही होत नाहीत. अशा प्रकारे अगदी तळागाळातील लोकांना औषधे उपलब्ध होतील अशी सोय या 'आजीबाईचा बटवा' या उपक्रमातून केली आहे.
दोन डिसेंबर २००० मध्ये 'ग्रामीण आरोग्य विभागा'ची स्थापना करण्यात आली. खेड्यातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणे हे या विभागाचे मुख्य काम. रोग निर्मूलन व रोगापासून बचाव कसा करावा याचे धडे या विभागातर्फे गावकऱ्यांना दिले जातात. लहान मुलांना लस देणे, पाणी स्वच्छ उकळून व गाळून पिणे, संतुलित व ताजे सकस अन्न खाणे या सर्वांचे महत्त्व गावकऱ्यांना दृकश्राव्य माध्यमातून, चलचित्रे, स्लाईड शो दाखवून पटवून दिले जाते.
२८ नोव्हेंबर २००१ रोजी दाईंना प्रशिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश मृत्यू दर कमी करणे हा होता. भारतात अजूनही खेड्यापाड्यात बाळंतपण घरीच सुईणीच्या मदतीने केले जाते. या सुईणींना प्रशिक्षण दिले जाते. त्या सुईणी संतुलित आहाराचे महत्त्व, बाळाची काळजी घेणे, कुटुंब नियोजन करणे, दोन मुलांच्यात किती अंतर असावे, गरोदरपणात काय खावे, कशी काळजी घ्यावी इत्यादी गोष्टी आदिवासी स्त्रियांना समजतील अशा सोप्या भाषेत सांगतात. दाईंना प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांना चरितार्थाचे साधन मिळाले व वाजवी दरात गरीब आदिवासी स्त्रियांना सुविधा मिळाली. या अशा योजना सुरू करण्याच्या मागचा हेतू सर्वांना चरितार्थाचे साधन मिळावे, परंपरागत पद्धती चालू राहाव्यात, हा होता. नानाजींना पूर्वापार चालत आलेल्या पद्धती बदलायच्या नव्हत्या, पण त्यात योग्य त्या सुधारणा करायच्या होत्या. शिक्षण, स्वावलंबन, आत्मनिर्भरता या गोष्टींवर त्यांचा भर होता.
जयप्रभाग्राम पासून जवळच 'माँ सत्यबाई मातृशिशु कल्याण केंद्र' २००१ मध्ये स्थापन झाले. येथे गरीब बहिणींची गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत काळजी घेतली जाते. त्यांची वारंवार तपासणी केली जाते. योग्य ती औषधे दिली जातात. आपल्याकडे कुपोषण ही फार गंभीर समस्या आहे. स्वस्थ, निरोगी बालक जन्माला यावे यासाठी ही संस्था काळजी घेते.
२६ मार्च २००० रोजी 'चलचिकित्सालय' सुरू करण्यात आले. या विभागातर्फे आरोग्य शिबिरे भरवली जातात. रुग्णांना मोफत औषध दिले जाते. यामुळे मृत्यू दर घटला आहे. या चिकित्सालयात रक्त, लघवी, बीपी, इसीजी, क्ष किरण तंत्र वापरून रुग्णाचे निदान केले जाते. अनेक कुटुंबे आज या चिकित्सालयाचा लाभ घेत आहेत. 'थारू' समाजातील लोकांना याचा खूप फायदा होत आहे.
कृषी व आरोग्य याचबरोबर नानाजींनी औद्योगिक प्रशिक्षणाला खूप महत्त्व दिले. 'कमवा व शिकवा' हा धडा त्यांनी तरुणांना घालून दिला. ‘तरुणांना एखाद्या आवडीच्या व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन उत्पादन क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिली पाहिजे’ या मताचे नानाजी होते. जयप्रभा ग्राम इथे कार्यशाळा आहे. तिथे युवकांना नवनवीन तंत्रे शिकवली जातात. लाकडाचे फर्निचर बनवणे, लोखंडाच्या वस्तू बनवणे अशा गोष्टी शिकवून युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. प्रत्येक हाताला काम मिळाले पाहिजे, म्हणजे प्रत्येक व्यक्ती स्वावलंबी होईल, आत्मनिर्भर होईल. याच्यातून त्यांचा सामाजिक स्तर उंचावेल. 'यष्टीपासून समष्टीपर्यंत' प्रगती होईल असा विचार नानाजींनी केला.
जयप्रभा ग्राम येथे त्यांनी 'चिन्मय ग्रामोदय विद्यालयाची' स्थापना १९८१ मध्ये केली. शिक्षणामुळे मुलांवर संस्कार होतील. त्यांना मोठेपणी अर्थार्जन करण्यासाठी काम मिळेल, हा या शाळेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अनेक उपक्रम या शाळेत राबविले जातात. याशिवाय थारू जातीच्या मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून १९८८ मध्ये 'पचपेडवा' (बलरामपूर) येथे नानाजींनी एक 'वनवासी केंद्र' स्थापन केले. येथे विद्यार्थी वसतीगृहही आहे. हे केंद्र नेपाळ सीमेलगत आहे. वनवासी मुलांना शिक्षणाद्वारे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या वसतीगृ व वनवासी केंद्राचा मुख्य हेतू होता.
व्यक्तीच्या शारीरिक व सामाजिक विकासाबरोबर आध्यात्मिक विकास पण झाला पाहिजे हे नानाजींनी जाणले. भक्ती माणसाच्या जीवनात कायापालट घडवून आणते. भारतात भक्तीची परंपरा आहेच. ही परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी नानाजींनी जयप्रभा ग्राम इथे एक 'भक्तिधाम' उभारले. या भक्तीधाम मध्ये भजन व सत्संग होतो. मुलांसाठी संस्कार वर्ग घेतले जातात. मंदिरात येणारा पैसा समाजकार्यासाठी वापरला जातो. हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिथे शिवमंदिर, रामकुंड, जानकी कुंड, चार धाम यांचे दर्शन; तसेच वेगवेगळ्या तीर्थस्थानांचे दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात संत महंतांच्या अप्रतिम प्रतिमा पहायला मिळतात. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, शंकराचार्य, संत कबीर, गुरुनानक, भगवान बुद्ध इत्यादींच्या दर्शनाचा लाभ घेता येतो. मंदिराच्या बांधणीसाठी लागणारा निधी सामान्य माणसांच्या सहभागातून उभा केला आहे. मंदिरामध्ये सामूहिक प्रार्थना घेतल्या जातात. जेणेकरुन कुटुंबात स्नेहाचे, समाधानाचे वातावरण राहील.
अशा रीतीने अनेक नवीन प्रकल्प राबवून नानाजींनी गोंडा जिल्ह्याचे रूप पालटून टाकले. लोकांचा आर्थिक, सामाजिक व अध्यात्मिक स्तर वाढविण्यासाठी त्यांनी रक्ताचे पाणी केले. लोकांना शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व स्वावलंबन या गोष्टींचे महत्त्व पटवून दिले.
गोंडा प्रकल्प यशस्वी झाल्यावर नानाजी तिथून बाहेर पडले. त्यांनी 'चित्रकुट प्रकल्पा'ची मुहूर्तमेढ रोवली. नानाजींना कुठे व कधी थांबायचे, हे बरोबर कळले होते. आपले कार्य संपले की तिथून निवृत्ती घेणे योग्य, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
नीलम संजीवरेड्डी यांच्या हस्ते गोंडा प्रकल्पाचे उदघाटन