"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"लोकशाही टिकवायची असेल तर शेतीवर आधारित समाजव्यवस्था हवी." - पश्चिमी देशांत शेती ही भांडवली दृष्टिकोनातून पाहिली जाते, पण भारतात ती जीवनपद्धतीचा भाग आहे. येथे ७०% जनता शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे लोकशाही टिकवायची असेल, तर स्वयंपूर्ण, स्वावलंबी शेती हवी.
- नानाजी देशमुख
नानाजी म्हणत "आपण भारतीय लोक आदर्श व्यक्तीला देवत्व बहाल करतो आणि म्हणतो, आम्हाला त्यांच्यासारखे होता येणार नाही. हे योग्य नाही. माणसाने ठरविले तर तो नराचा नारायण होऊ शकतो. यासाठी मला प्रभू रामचंद्राचे जीवन त्यांना देवरूपात न दाखवता मनुष्य रूपात दाखवायचे आहे."
याच हेतूने त्यांनी चित्रकूटला शिल्पातून रामाच्या जीवनातील ठळक प्रसंग दाखविण्याचे ठरवले. दुसरे कारण म्हणजे प्रभू रामचंद्र वनवासाच्या १४ वर्षांपैकी बारा वर्षे चित्रकूट येथे राहिले होते.
श्रीरामांचे चरित्र हजारो वर्षे भारतीयांना भुरळ घालत आले आहे. रामचरित्र म्हणजे आदर्शांचा परमोच्च आदर्श पुत्र, आदर्श बंधू,आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श शत्रू, आदर्श पती या स्वरूपात राम समाजासमोर आहेत. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात वेगवेगळ्या भाषेत रामायणे लिहिली गेली आहेत. सर्वसाधारणपणे रामायणाची कथा सर्व रामायणात सारखीच आहे. थोडाफार फरक कुठे कुठे आढळतो. नानाजींनी वेगवेगळी रामायणे वाचली. नानाजींचा आदर्श प्रभू रामचंद्र होते. रामाने युद्ध जिंकले तरी कुठेही राज्यपद स्वीकारले नाही. वालीचा वध केल्यानंतर त्याने सुग्रीवाला राजा केले. लंकेत रावणाला मारल्यावर बिभीषणाला राज्याभिषेक केला. रामाने राज्याचा मोह दूर सारला व ते वनवासाला गेले. नानाजींनी तेच केले. मंत्रीपदाचा मोह टाळला व वनवासी, आदिवासी लोकांची सेवा करण्यासाठी समाजकारणात प्रवेश केला. नानाजींनी चारपाच वर्षे रामायणातील कोणते प्रसंग शिल्परूपात दाखविता येतील याच्यावर चिंतन केले. प्रकल्प पाहताना आधी शिल्प पाहणार व मग संदेश मिळणार म्हणून या प्रकल्पाचे नाव 'राम दर्शन' असे ठेवले.
शिल्प बनविणे व त्यासाठी माहिती लिहिणे हे काम पण तसे सोपे नव्हते. हे सर्व करण्यासाठी योग्य माणसांची निवड करणे महत्त्वाचे होते. नानाजींनी शिल्प बनवण्यासाठी श्री बहुलकर यांची निवड केली व शिल्पांची माहिती लिहिण्यासाठी प्राध्यापक राम शेवाळकर यांची निवड केली.
तुलसीदासांच्या हस्ताक्षरातील पाने मिळाल्यापासून नानाजींच्या मनात काहीतरी करावे अशी इच्छा होती. रामायणाचे किंवा रामायणासंबंधी नक्की काय करावे याची चर्चा एक दिवस ते त्यांच्या जयपुरिया या उद्योजक मित्राशी करीत होते. जयपुरिया यांच्या वडिलांच्या मनात राम मंदिर उभारावे असे होते. पण हे मंदिर उभे करण्याचे स्वप्न पूर्ण व्हायच्या आधीच ते निधन पावले. नानाजींशी बोलत असताना श्री राजाराम जयपुरिया यांनी ठरविले, नानाजींना राम मंदिर उभारण्यासाठी आर्थिक मदत द्यायची. नानाजींच्या मनात राम मंदिर उभे करण्याचे नव्हते. त्यांना रामायणातील काही घटना शिल्परूपात दाखवायच्या होत्या. त्यांनी ‘हे करणे योग्य आहे, तुम्ही याला मदत करा’ असे जयपुरिया यांना समजावून सांगितले .
पुढे चार साडेचार वर्षात एकूण पाच इमारतींमध्ये ३२ दृश्यांतून राम कथा भव्य दिव्य स्वरूपात साकार झाली. रेखाटन, चित्रावली व फायबर मोल्ड्स अशा विविध माध्यमातून ही दृश्य साकारण्यात आली. प्रत्येक दृश्याच्या बाजूला त्याचे योग्य शब्दात वर्णन करणारे व त्यातून काय संदेश मिळतो हे सांगणारे फलक हिंदी व इंग्रजीतून लिहिले आहेत .
'राम दर्शन' च्या प्रवेशद्वाराशी श्री हनुमान याची भव्य शिल्पाकृती आहे. त्यानंतर सुंदर बगीचा आहे. रामायणाच्या लेखनात मग्न असणारे वाल्मिकी ऋषी व 'रामचरितमानसा'चे पठण करणारे संत तुलसीदास यांच्या प्रतिमा तिथे आपले लक्ष वेधून घेतात. या परिसरात ऋतूंचा, हवामानाचा विचार करून विविध वृक्ष लावले आहेत. समर्थ रामदास जसे प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म व सखोल विचार करीत, त्याप्रमाणे नानाजी प्रत्येक गोष्टीचा विचार करीत. नानाजींनी शिल्प तयार करताना योग्य त्या घटना निवडल्या होत्या. त्यातून श्रीरामाचे निरनिराळे गुण साकार झालेले दिसून येतात.
चित्रकूट हे श्रीरामांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थळ. आता कलियुगात नानाजींच्या भव्य दिव्य प्रकल्पामुळे प्रकाशात आले आहे. नानाजींनी आपले नाव कुठेही नमूद केले नाही म्हणून त्यांना कोणीतरी विचारले, "तुम्ही तुमचे नाव कुठे का लिहिले नाही?" त्यावर नानाजी म्हणाले, "वेरूळची लेणी किंवा दक्षिण भारतातील भव्य दिव्य मंदिरे ज्यांनी उभारली त्यांची नावे त्यावर कोरली आहेत का?" असे हे निस्पृह नानाजी. पण 'चित्रकूट' म्हटले की नानाजींचे नाव त्याबरोबर आपोआपच येते .
२७ फेब्रुवारी २०१० रोजी सद्गुरू सेवा संघ चित्रकूट येथे नानाजींनी शेवटचा श्वास घेतला.
एका कवीने चित्रकूट प्रकल्पावर कविता केली आहे. कवीचे नाव माहित नाही. ती कविता खालील प्रमाणे :
श्रीरामाच्या पुण्यभूमीचे, भाग्य आता उजळले |
ग्रामविकासाचे तेजोमय, दीप इथे लागले ||
मंदाकिनीच्या नदीकिनारी, नवल एक घडले |
चित्रकूट हे नानाजींचे, स्वप्न इथे फुलले ||
वनवासींच्या कल्याणाचे, चिंतन आधी केले |
चिंतनातुनी नियोजनाचे, अमृत मंथन झाले ||
मंथनातून नवनिर्मितीचे, नवनीत वर आले |
चित्रकूट हे नानाजींचे, स्वप्न इथे फुलले ||
समर्पणाचे स्वप्न घेऊनि, दूत इथे उतरले |
जनसेवेचे कलश आणुनी, इथे रिते केले ||
गरीब आणि अज्ञानी, जन उध्दरीत गेले |
चित्रकूट या गावी सुंदर, एक स्वप्न फुलले ||
मानव सेवा हीच प्रभूची, आरती आणि पूजा |
रघुपतिविण नाही कोणी, आदर्शच दुजा ||
लीन होऊन प्रभुच्या चरणी, कर्मयोगी आले |
दिव्य स्वप्न श्री नानाजींचे, आता इथे उमलले ||