"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"भारतीय संस्कृती निसर्गाचे शोषण नाही, संवर्धन शिकवते." - आपण गंगेला आई, भूमिला माताच समजतो. भारतीय संस्कृती निसर्गाचा उपयोग करते, पण शोषण करत नाही. जैविक शेती हेच आपल्या संस्कृतीचे खरे प्रतिबिंब आहे.
- नानाजी देशमुख
शाळेत असताना केलेल्या व्यवसायात त्यांना जे पैसे मिळाले ते साठवून नानाजी, आबा देशपांडे, बाबाजी सोनटक्के आणि बाजीराव देशमुख हे चौघे मित्र पुढील शिक्षण घेण्यासाठी पिलानी येथील 'बिर्ला विश्वविद्यालया'त गेले. घराचा, गावाचा उंबरठा ओलांडल्यानंतर नानाजींच्या अंगभूत गुणांना वाव मिळाला. स्वतःचे काम स्वतः करायचे, घरातल्या कामाला मदत करायची, हे तर त्यांच्या अंगवळणी पडलेच होते. शिवाय आता तर काहीतरी व्यवसाय करुन थोडेसे पैसे मिळविल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. कॉलेजमध्ये ते प्रत्येक स्पर्धेत, प्रत्येक कार्यक्रमात भाग घेत असत. मग ते चित्रकला असो नाहीतर वक्तृत्व. एकदा तर त्यांनी नाटकात पण भाग घेतला. एवढे करीत असताना ते पटांगणावर सुध्दा पुढे होते. कॉलेजमध्ये ते फुटबॉल संघात उत्तम खेळाडू म्हणून गाजले. शाखेत रोज कबड्डी असेच. आणि हे सगळे सांभाळून अभ्यास करणे होतेच.
नानाजी आपल्या आयुष्यातला एक सेकंदही वाया घालवत नसत. अर्थात अशा हरहुन्नरी, कर्तबगार, बुद्धिमान मुलाचे नाव महाविद्यालयाचे संस्थापक शेठ घनश्यामदास बिर्ला यांच्या कानावर गेले. त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सांगितले, "या होतकरू तरुण मुलाला माझ्याकडे पाठवा. मी त्याला माझा खाजगी सचिव म्हणून नेमतो. त्याच्या जेवणाची व राहण्याची सोय मी करीन आणि त्याला महिना ७०८० रुपये वेतन पण देईन." खरं तर ही सोन्यासारखी संधी नानाजी यांच्यापुढे चालून आली होती.
दुसरा एखादा युवक असता तर त्याने या प्रस्तावाला तत्काळ होकार दिला असता. पण नानाजींना हा मार्ग स्वीकारायचा नव्हता. त्यांना आजन्म ब्रह्मचर्य पाळून संघाचे काम करायचे होते. अर्थातच नानाजींनी नम्रपणे या प्रस्तावाला नकार दिला.
कॉलेज, अभ्यास व इतर सर्व गोष्टी सांभाळून नानाजी संघाचे कार्य तन्मयतेने करीत होते. १९४० मध्ये नागपूरला मे महिन्यात चाळीस दिवसांचा संघ शिक्षा वर्ग झाला. त्या वर्गात प्रशिक्षण घेण्यासाठी नानाजी गेले. भारतातील विविध भागातून अनेक स्वयंसेवक या निवासी वर्गाला आले होते. स्वयंसेवकांच्या कपड्यांचा, रहाण्याचा, जेवण व गाडी भाड्याचा खर्च राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत नाही. हा खर्च प्रत्येक स्वयंसेवकाने स्वतः करायचा असतो. असे असूनही खूप स्वयंसेवक या वर्गाला आले.
१९४० हे वर्ष संघासाठी महत्त्वाचे होते कारण रा.स्व.संघ सुरू होऊन पंधरा वर्षे झाली होती. सुरुवात झाली होती केवळ १५२० स्वयंसेवकांपासून आणि आता संघ वटवृक्षाप्रमाणे वाढला होता. अर्थात यामागे संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांची प्रचंड मेहनत होती. डॉ. हेडगेवार आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे नव्हते. काहीसे कठोर वाटणारे, तोंडावर देवीचे व्रण असणारे, पण ते ज्यांच्याशी संवाद साधत, तो माणूस त्यांचाच होऊन जाई. त्यांच्या बोलण्यातून समोरच्या माणसाच्या हृदयात देशभक्ती जागृत होई.
त्यांचे बोलणे तळमळीचे व देशभक्तीने भारलेले असे. तो काळही तसाच होता. प्रत्येक भारतीय देशभक्तीने, देशप्रेमाने भारलेला होता. या अशा देशभक्तीने भारलेल्या समाजाला संघटित केले पाहिजे असे डॉ. हेडगेवार यांना वाटत असे. ‘आपला देश समृद्ध, संपन्न व स्वावलंबी करण्यासाठी अशा संघटित समाजाची अत्यंत गरज आहे’ ही जाणीव होऊन डॉक्टरांनी संघाची स्थापना केली होती.
संघ वर्गाच्या शेवटच्या दिवशी डॉ. हेडगेवारांनी सर्व शिबिरार्थींसमोर आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी जेमतेम पन्नाशी गाठली होती पण अती कष्टाने त्यांची प्रकृती खालावली होती. ते म्हणाले, "आज माझ्या डोळ्यांनी मी तुम्हा सर्वांच्या रुपाने 'लघुभारत' पाहत आहे. तुम्ही सर्वांनी मनाशी ठरवा की मी आजन्म संघाचे कार्य करीन."
याचवेळी डॉक्टरांनी संघाचे उदिष्ट व पुढे संघाने काय काम करायचे आहे ते सर्वांना सोप्या शब्दात सांगितले. त्यांनी सर्वांना प्रेरणा दिली व मार्गदर्शन केले. सगळे शिबिरार्थी डॉक्टरांचे शब्द मनात बाळगून, मनातल्या मनात ‘संघाचे कार्य आजन्म करावयाचे’ हे ठरवून घरी परतले.
हे डॉक्टरांचे शेवटचे बौद्धिक ठरले. त्यानंतर त्यांची प्रकृती जास्त बिघडली. २१ जून १९४० रोजी डॉ. हेडगेवार यांची प्राणज्योत मालवली. देशातील सर्व स्वयंसेवकांना निरोप गेला. सर्वजण मिळेल त्या वाहनाने नागपूरला पोचले. नानाजी पण अत्यंत दु:खी अंतःकरणाने नागपूरला पोहोचले. त्यांच्या कानात डॉक्टरांचे शब्द गुंजी घालत होते,
"जोपर्यंत शरीरात प्राण आहेत, तोपर्यंत मी संघाला विसरणार नाही अशी प्रतिज्ञा करा. कुठल्याही प्रसंगात विचलित होऊ नका. संघ कार्यासाठी तुमचे शरीर झिजू देत."
नानाजी फार संवेदनशील होते व त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वाच्या, डॉ. हेडगेवार यांच्या धगधगत्या चितेसमोर त्यांनी परत एकदा प्रतिज्ञा केली
"मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत संघाचे कार्य करीन. संघकार्य हे माझे जीवित कार्य असेल. नानाजींनी त्यांची 'संघ प्रचारक' बनण्याची इच्छा तत्काळ डॉ. हेडगेवार यांचे सहकारी बाबासाहेब आपटे यांना सांगितली. बाबासाहेब आपटे यांनी विचार केला व भाऊ जुगादे यांच्या बरोबर नानाजींना आग्रा येथे संघाचे काम वाढविण्यासाठी पाठवले. ३ जुलै १९४० रोजी नानाजी व भाऊ जुगादे आग्रा येथे गेले. यावेळी नानाजी २४ वर्षांचे होते. त्यांनी त्यांचे शिक्षण अर्धवट सोडले होते.
यावेळी योगायोग इतका चांगला होता की कानपूर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय हे M.A. करण्यासाठी आग्रा येथे आले होते. नानाजी व दीनदयाळ समवयस्क व एकाच विचारांचे असल्यामुळे त्यांची गाढ मैत्री झाली. दीनदयाळ यांच्या प्रगल्भ विचारांचा नानाजींवर पगडा पडला. दीनदयाळ यांच्या 'एकात्म मानव वाद' ह्या तत्त्वज्ञानामुळे नानाजी प्रभावित झाले. नानाजी यांनी पुढे जे सामाजिक कार्य केले ते या तत्वज्ञानावर आधारित असेच होते. या काळात दीनदयाळजी व नानाजी यांनी 'राष्ट्रधर्म' हे मासिक, 'पांचजन्य' हे साप्ताहिक व 'स्वदेश' हे दैनिक सुरु केले. ‘भाऊ जुगादे, नानाजी व दीनदयाळ असे तीन चांगले कार्यकर्ते एकाच जागी राहू नयेत, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी राहून कार्य करावे’ असे तत्कालीन 'प्रांत प्रचारक' भाऊराव देवरस यांना वाटले म्हणून त्यांनी नानाजींना १९४० मध्येच उत्तर प्रदेशात, गोरखपूर येथे 'संघ प्रचारक' म्हणून पाठवले.
डॉ. हेडगेवार यांच्या मृत्यूनंतर १९४० मध्ये संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी झाले. गुरुजींची निवड स्वतः डॉक्टरांनी मृत्यू पूर्वी केली होती. गोरखपूर व संपूर्ण उत्तर प्रदेश येथे संघ प्रचारक म्हणून नानाजी गेले. तेथे राहण्याची व जेवणाची काही सोय नव्हती. ते धर्मशाळेत रहात. पण कुठल्याही धर्मशाळेत तीन दिवसांपेक्षा जास्त राहता येत नाही म्हणून दर तीन दिवसांनी जागा बदलायची. खायला मिळाले तर मिळाले, नाहीतर पाणी प्यायचे असे काही महिने नानाजींनी काढले. त्यांच्या अंगी नेतृत्व गुण होते व संवाद साधण्याची उत्तम शैली होती म्हणून दोन तीन वर्षांतच संघाच्या २५० शाखा उत्तर प्रदेशात सुरू झाल्या. प्रत्येक गावात एक शाखा सुरू केली.
प्रथम गोरखपूर येथे संघासाठी युवक मिळविणे त्यांना कठीण गेले. मग त्यांनी एक युक्ती केली. एका पटांगणावर काही तरुण फुटबॉल शिकत होते. तिथे जाऊन नानाजींनी त्यांच्या मास्तरांना विनंती केली, “मला पण खेळायला घ्या.” ते मास्तर नानाजींना घ्यायला तयार नव्हते. शेवटी हो नाही करत त्यांनी नानाजींना टीममध्ये घेतले. नानाजी उत्तम फुटबॉल खेळणारे होते. त्यामुळे तिथल्या तरुणांशी त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे संघाची शाखा सुरू करणे अगदी सोपे झाले, हे सांगायलाच नको. नुसती शाखा सुरू झाली असे नाही, तर त्यातले सहासात तरुण महिन्याभराच्या संघवर्गात प्रशिक्षण घेण्यासाठी नागपूरला गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिल्या पिढीतील प्रचारक असेच होते, म्हणून संघाचा विस्तार भारतभर झाला.
१९४० साली नानाजींच्या मोठ्या भावाच्या एकुलत्या एक मुलाचे निधन झाले. वंश पुढे चालू राहिला पाहिजे म्हणून नातेवाईकांनी नानाजींना लग्न करायचा आग्रह केला. पण नानाजींनी त्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. नानाजींनी स्वतःचा संसार मांडला नाही, पण संघ विस्ताराचे कार्य चालू असताना त्यांनी अनेक कुटुंबे जोडली. प्रत्येक घरात त्यांचे मनापासून स्वागत होत असे. गोरखपूरला नानाजी एका झोपडीत राहत होते. त्यांच्या खाण्याची आबाळ होत होती. धड अंथरूण पांघरूण सुध्दा नव्हते. नंतर त्यांची ओळख एक वकील घनश्याम नारायण प्रसाद सिंह यांच्याशी झाली. त्यांनी नानाजींची आपल्या घरात रहायची सोय केली. पण त्यांनी एक अट घातली की नानाजींना स्वयंपाक करावा लागेल. नानाजींना उत्तम स्वयंपाक करता येत होता. त्यामुळे त्यांना काही कठीण गेले नाही.
गोरखपूरला नानाजींच्या खूप ओळखी झाल्या. ते झोपडीत रहाणाऱ्या मजुरापासून, बंगल्यात राहणाऱ्या प्रतिष्ठित डॉक्टर, वकील कोणाकडेही जात असत. सर्व लोकांना त्यांनी संघ कार्याशी जोडून घेतले व प्रत्येकाला काहीतरी जबाबदारी दिली. एकदा गुरुपौर्णिमेच्या उत्सवात भाषण देण्यासाठी नानाजींना व अध्यक्ष म्हणून घनश्याम प्रसाद सिंह यांना बोलावण्यात आले. दोघांनाही हे माहित नव्हते की ते एकाच कार्यक्रमाला जाणार आहेत. भाषण ऐकल्यावर घनश्याम यांना कळले की नानाजी हे ज्येष्ठ 'संघ प्रचारक' आहेत. मग त्यांना लाज वाटली की नानाजी एवढे श्रेष्ठ असून मी त्यांच्याकडून स्वयंपाक करून घेत होतो. अर्थात हे वकील नंतर संघाचे आश्रयदाते झाले.
नंतर गोरखपूरला संघाच्या कार्यालयात ४५ स्वयंसेवक एकत्र राहत होते. ते चुलीवर स्वयंपाक करीत असत. स्वयंपाक झाल्यावर जो कोळसा शेगडीत उरायचा तो तांब्यात घालून नानाजी कपड्यांना इस्त्री करीत. त्यांना स्वच्छ, नीटनेटके इस्त्री केलेले कपडे घालायला आवडत.
नानाजींचा स्वभाव असा होता की ते जिथे जात, तिथलेच होऊन जात. या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी जरी लग्न केले नाही तरी त्यांना अनेक मानसपुत्र, मानसकन्या, सुना, नातवंडे होती. 'हे विश्वचि माझे घर' ही उक्ती त्यांच्यासाठी सार्थ ठरते.