"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"देशाला क्रांतीची नाही, तर पुनर्रचनेची गरज आहे." - जयप्रकाशजींनी 'समग्र क्रांती'चा नारा दिला. परंतु त्याचा हेतू सत्ता बदल नव्हता, तर विधायक लोकशक्ती उभी करणे हा होता. आज त्याच संकल्पनेतून रचनात्मक प्रयोगांची गरज आहे.
- नानाजी देशमुख
संघाच्या स्थापनेपासून डॉ. हेडगेवार यांनी मनाशी एक ठरवून ठेवले होते की, ज्या गावात संघाची शाखा सुरू करायची, त्या गावातल्या प्रतिष्ठित गृहस्थांना या कार्यासाठी जोडून घ्यायचे. अशा व्यक्तींमुळे त्यांना गावात काम करणे, स्वयंसेवकांची संख्या वाढवणे सहज सोपे होत असे. यातल्या एखाद्या व्यक्तीवर त्या गावाची जबाबदारी म्हणजे धुरा सोपवायची. डॉक्टरांनी चालू केलेला हा प्रघात पुढे त्यांच्या प्रचारक कार्यकर्त्यांनी पण चालू ठेवला. समर्थ रामदास 'दासबोधा'त म्हणतात की, ज्या गावात तुम्ही रहायला जाल, तिथला प्रतिष्ठित माणूस तुमच्या ओळखीचा पाहिजे. अगदी याच वचनानुसार संघ प्रचारक काम करत.
आग्रा सोडून नानाजी जेव्हा गोरखपूरला संघ प्रचारक म्हणून गेले तेव्हा विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांशी त्यांचा संबंध आला. यात 'गीता प्रेस'चे संस्थापक हनुमान प्रसाद पोद्दार, डॉ. हृषिकेश बॅनर्जी, वकील घनश्याम प्रसाद सिंह, साखर कारखान्याचे व्यवस्थापक श्री. ठाकूरदास साहनी अशा अनेकांचा उल्लेख करता येईल.
नानाजींनी या प्रत्येकावर संघाच्या कुठल्यातरी कामाची जबाबदारी सोपवली व थोड्याच दिवसांत गोरखपूर येथे संघाची भक्कम उभारणी केली. तरुणांना संघाकडे आकर्षून घेण्यासाठी ते काहीतरी नवीन कार्यक्रम आखत, त्यामुळे अर्थातच तरुण संघाकडे ओढले जात.
गोरखपूरला आल्यावर पहिले काही दिवस नानाजींसाठी खूप कठीण गेले. ना धड रहायची सोय, ना जेवणाची. पण नानाजी हार मानणारे नव्हते. ते रोज नवीन ठिकाणी जात, लोकांशी बोलत, आपले म्हणणे पटवून देत.
असेच एकदा ते बलरामपूर येथे अग्रवाल या जव्हेरीच्या घरी गेले होते. त्यांच्याशी बोलत असताना एक खडे विकणारा व्यापारी तिथे आला. नानाजींना या क्षेत्रातील ज्ञान होते म्हणून ते सुद्धा त्यांच्या चर्चेत सहभागी झाले. नानाजींचे हे ज्ञान पाहून, त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर सूचना ऐकून अग्रवाल बंधूंचा त्यांच्या बद्दलचा आदर दुणावला. त्यातल्या एका भावाने कैलाशचंद्र अग्रवाल यांनी नानाजींना विचारले, "तुम्ही कुठे राहता ?"
अर्थात नानाजींनी उत्तर दिले, "मिळेल त्या धर्मशाळेत रहातो. पण तीन दिवस झाले की दुसरी धर्मशाळा शोधायची. आमच्या सारख्या संघाचे कार्य करणाऱ्या माणसांचे तर 'हे विश्वची माझे घर' ही भावना असते." हे ऐकल्यावर अग्रवाल बंधू त्यांना घरी घेऊन गेले व त्यांनी नानाजींची राहण्याची व जेवणाची सोय केली. पुढे या अग्रवाल बंधूंच्या सहाय्याने बलरामपूरला संघाची एक शाखा सुरू करण्यात आली.
संघाच्या शाखेत सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तीने पार पडत. नियोजनबद्ध कार्यक्रम, मग अगदी तो दैनिक कार्यक्रम का असेना, हे शाखेचे वैशिष्ट्य.! प्रार्थना, व्यायाम, शारीरिक खेळ व मग काही वैचारिक मंथन. या सर्व कार्यक्रमातून युवकांवर देशभक्ती, राष्ट्रभक्ती, शौर्य इत्यादी गोष्टींचे संस्कार सहजच होत असत. कधीकधी एखाद्या ठिकाणी ८१० दिवसांचे उन्हाळी किंवा हिवाळी शिबिर आयोजित केले जायचे. यात स्वयंसेवकांसाठी तंबू उभारणे, स्वयंपाक करणे, स्वच्छता राखणे अशी सर्व कामे स्वयंसेवक करीत. स्वावलंबनाचे धडे यातून आपोआपच मिळत.
१९४३ मध्ये एकदा 'देवरिया' जिल्ह्यात असेच हिवाळी शिबिर आयोजित केले होते. पाचशे तंबू उभारले होते. नानाजींसाठी एक स्वतंत्र तंबू उभारला होता. नानाजी स्वयंसेवकांना म्हणाले,
"माझ्यासाठी वेगळी व्यवस्था कशाला? तुमच्याप्रमाणे मी सुद्धा थंडीत तुमच्या बरोबर राहणार."
याच शिबिरात समारोपाच्या वेळी त्यांनी शंखाच्या आकाराचा व्यूह रचला. सतरा हत्ती व काही घोडेस्वार आणले होते. स्वयंसेवकांनी गावकऱ्यांना युद्धाचे प्रात्यक्षिक दाखविले. ते पाहताना सर्वांच्या अंगात वीरश्री संचारली व अंगावर रोमांच उठले. अशा पद्धतीने नानाजी व इतर स्वयंसेवक आजूबाजूच्या लोकांना आकर्षित करुन घेत.
आगळ्यावेगळ्या पद्धतीने सादरीकरण केल्यामुळे अर्थातच गावकरी तिथे येत व संघाकडे ओढले जात. अशा अनेक नाविन्यपूर्ण प्रयोगांनी नानाजींनी थोड्याच वर्षात उत्तर प्रदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांचे जाळे निर्माण केले. त्या काळात भारत ब्रिटिशांच्या गुलामीत होता म्हणून अशा प्रकारच्या संघटनेचे अत्यंत महत्त्व होते. लोकांच्यात एकीची भावना निर्माण करुन त्यांच्यात देशभक्तीची भावना प्रज्वलित करणे गरजेचे होते. अशा कार्यक्रमातून संघाचे प्रचारक लोकांच्यात आत्मविश्वास निर्माण करीत होते.
१९४४ मधे चिंतोली गावावर 'नारायणी' नदीला पूर आला. गावकरी पुराने वेढले गेले. त्यांना सोडवायचे कसे किंवा त्यांना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक गोष्टी कशा पोहोचवायच्या, हा प्रश्न पडला. नानाजींना जेव्हा हे कळले तेव्हा ते आपल्या स्वयंसेवकांना घेऊन पूरग्रस्त ठिकाणी गेले. त्यांनी या संकटात सापडलेल्या गावकऱ्यांना आवश्यक ती अन्न सामुग्री पोचवली. त्यांना सर्वतोपरी मदत केली. हे सर्व कार्य काँग्रेसचे नेता नेते बाबा राघवदास बघत होते. ते स्वयंसेवकांच्या नि:स्वार्थी भावनेने अत्यंत प्रभावित झाले. संघाचे स्वयंसेवक नेहमीच कोणतेही संकट येते तेव्हा आपल्या जीवाची पर्वा न करता संकटग्रस्तांना मदत करतात हा नेहमीचा अनुभव आहे, मग ते संकट अस्मानी वा सुलतानी, कसेही असो. किल्लारी येथे भूकंप झाला. हजारो लोक मृत्युमुखी पडले. इमारती जमीनदोस्त झाल्या. लोक त्या इमारतींखाली गाडले गेले. त्यांना मदत करायला स्वयंसेवकांचे हजारो हात पुढे आले. लोकांच्या सुखदु:खाविषयी सहानुभूती व सेवावृत्ती ही संघाची वैशिष्ट्ये.
भारत स्वतंत्र झाल्यावर पंजाबात दंगली उसळल्या. तिथे तेव्हाही स्वयंसेवकांनी निष्काम बुद्धीने काम केले. कुठलाही गाजावाजा न करता केवळ प्रसिद्धी साठी काम करणे हे संघाच्या धोरणात बसत नाही. नानाजी याला अपवाद नव्हते.
सावकाशपणे पण ठामपणे संघाचे कार्य करणे हे नानाजींचे वैशिष्ट्य. त्यामुळेच गोरखपूर बरोबर देवरिया, बलिया, आझमगड, इत्यादी जिल्ह्यात त्यांचे काम वाढत होते. संघाचा विस्तार होत होता. अनेक विवाहित तरुण या संघ प्रचाराच्या कामासाठी जोडले गेले. पुढे याच तरुण प्रचारकांनी संघ आणि इतर सामाजिक संस्था व संघटना उभारण्याच्या कामात मोलाचे योगदान दिले. त्या काळात, म्हणजे १९४२ च्या सुमारास संघ विस्तारात उत्तर प्रदेश आघाडीवर होता. अर्थात याचे श्रेय नानाजींकडे जाते.
१९४३ मधे वाराणसी येथे संघ वर्ग सुरू झाला. नानाजी स्वतः तिथे तिसऱ्या प्रशिक्षण वर्गासाठी गेले होते. त्यावेळची एक घटना लक्षात घेण्याजोगी आहे. कुटुंबापेक्षा, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे, असे ही घटना दाखवून देते. नानाजी वाराणसी येथे एका वर्गाची व्यवस्था पाहत होते. तेव्हा त्यांचे वडील बंधू आबाजी यांची पत्नी निधन पावली अशी बातमी त्यांना मिळाली. याचवेळी ब्रिटिश सरकारने संघवर्ग बंद करण्याचा दबाव आणला. नानाजींना घरी न्यायला आबाजी आले, पण नानाजींनी प्रथम संघवर्गाच्या कामाला प्राधान्य दिले. नंतर ते घरी गेले. अर्थात घरी एक दोन दिवस राहून ते परत संघाच्या कामाला लागले. एवढी जाज्वल्य देशभक्ती व कामाप्रती निष्ठा.!
संघाचे दुसरे संघसंचालक माननीय गोळवलकर गुरुजी यांच्या आयुष्यातही अशीच घटना घडली होती. गुरुजी नागपूरला होते आणि त्यांना त्यांचे वडील मृत्यू पावले अशी बातमी मिळाली. गुरुजी संघाच्या महत्त्वाच्या कामात गुंतले होते. त्यांनी आईला निरोप पाठवला,
'संघाचा प्रत्येक स्वयंसेवक तुझा मुलगाच आहे, त्यामुळे माझी वाट न पाहता कोणाकडूनही वडिलांचे अंत्यसंस्कार करुन घे.’
त्यांची आई पण तितकीच धैर्याची व निष्ठेची. तिने एका स्वयंसेवकाकडून सर्व अंतिम संस्कार करून घेतले. दुसऱ्या दिवशी गोळवलकर गुरुजी घरी आले. मग मात्र आईचे सांत्वन करण्याऐवजी तेच ढसढसा रडले. 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' हा संघाचा धडा आहे.
समाजातील सर्व क्षेत्रात 'राष्ट्रीय विचारांचा प्रभाव निर्माण करावा' हा संघाचा मूळ हेतू होता. याच हेतूने लहान मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून नानाजींनी १९५० मधे गोरखपूर येथे 'सरस्वती शिशु विद्यालय' सुरू केले. वेद काळात ज्या प्रमाणे संस्कार व शिक्षण, दोन्हीला महत्त्व होते, त्याचप्रमाणे जीवनमूल्याधिष्ठित शिक्षण देण्यावर या विद्यालयाचा भर होता. नुसते पुस्तकी शिक्षण महत्त्वाचे नाही. त्याच बरोबर स्वावलंबन, सामंजस्य, शिस्त, समाजासाठी काही करण्याची भावना, संकटग्रस्तांना मदत करणे, अशी नीतीमूल्ये इथे शिकवली जातात. नानाजींनी या शाळांवर भर दिला. त्याचबरोबर तरुण विवाहित संघ प्रचारकांच्या चरितार्थाची व्यवस्था पण केली. नानाजींनी किती प्रगल्भपणे विचार करून देशकार्य केले याला तोड नाही.
नानाजी जरी संघाचे काम करत होते, तरी त्यांची मैत्री सर्व पक्षांच्या लोकांशी होती. महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, चरण सिंह व राम मनोहर लोहिया यांच्याबद्दल त्यांना आदर होता. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा त्यांच्यावर सर्वात जास्त प्रभाव होता. चित्रकूट व गोंडा येथील कार्याला जी तत्वज्ञानाची बैठक आहे, ती आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 'एकात्म मानव दर्शनाची' .