"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"विकासासाठी तंटामुक्त समाज हवा." - गावच्या न्यायालयीन तंट्यांमुळे ग्रामविकास अडतो. ‘आपण तंटे मिटवून गाव तंटामुक्त करू या’ हा विचार रुजला पाहिजे. गावगावात चर्चा करून, तंटे मिटवूनच समाज प्रगत होतो.
- नानाजी देशमुख
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे विभाजन झाले. त्यावेळी पाकिस्तानातून व पश्चिम बंगालमधून हिंदूंचे लोंढेच्या लोंढे भारतात येऊ लागले. दंगली उसळल्या. हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले. सर्वस्व गमावलेल्या असुरक्षित हिंदू निर्वासितांना धीर देणे व सुरक्षा देणे हे महत्त्वाचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले. श्रीनगरच्या विमानतळावरील बर्फ बाजूला करुन भारतीय हवाई दलाच्या विमानांना जागा करून देणे असो किंवा दिल्लीत महाजन वस्तीत रहायला गेलेल्या महात्मा गांधी यांना सुरक्षा देणे असो, सर्व कामात स्वयंसेवक पुढे होते. आपले काम चोख पार पाडून बाजूला व्हावे ही संघाची शिकवण! त्यामुळे स्वयंसेवक कधी प्रसिद्धीच्या मागे नसत.
३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांचा वध झाला आणि याचे खापर फुटले संघावर. संघाच्या अनेक मुख्य नेत्यांना व कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. यात नानाजी होतेच. नानाजींवर गंभीर आरोप ठेवण्यात आले. त्यांनी नथुराम गोडसेला पिस्तूल मिळवून दिले, असाही आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. म्हणून त्यांना पहिले काही दिवस खुनी व दरोडेखोरांमध्ये रहावे लागले.
नंतर त्यांना 'एकांत कोठडी'त ठेवण्यात आले. नानाजी तुरुंगात राहूनसुद्धा काम करत होते. तिथे त्यांचे संघटनात्मक संपर्काचे काम चालू होते. इथेच त्यांची भेट 'नॅशनल गार्ड' संघटनेचे नेते मोईनुद्दीन खान यांच्याशी झाली. खान यांना भेटण्यासाठी काँग्रेसचे नेते रफी अहमद किडवाई येत असत. खान यांना किडवाईंच्या घरुन जेवणाचा डबा येत असे. नानाजी व किडवाई यांची मैत्री झाल्यावर नानाजींना पण किडवाई यांच्या घरुन डबा येऊ लागला. पुढे मोईनुद्दीन तुरुंगातून सुटले. तरीही नानाजींना किडवाई यांच्या घरुन डबा येत असे. खरे तर नानाजी नथुराम गोडसे यांना कधीही भेटलेले नव्हते किंवा नानाजींचेची आणि नथुराम यांची ओळखही नव्हती याची खात्री पटल्यावर सहा महिन्यांनी नानाजींची तुरुंगातून निर्दोष मुक्तता झाली.
तुरुंगातून सुटल्यावर नानाजी, किडवाई यांच्या घरात राहून संघाचे कार्य करीत होते. नेहरू व किडवाई मित्र होते पण तरीही किडवाई यांनी नानाजींना आपल्या घरी ठेवून घेतले होते, हे लक्षात घेण्यासारखे आहे. नानाजी जगन्मित्र होते. मैत्रीच्या आड पक्ष किंवा राजकारण आले नाही. नानाजी जिथे जात, तिथे लोकांना आपलेसे करून घेत. पुढे किडवाई, व नानाजी यांचे स्नेहसंबंध दीर्घकाळ टिकून राहिले.
काही काळानंतर संघावरची बंदी उठविण्यात आली व नेत्यांना मुक्त करण्यात आले. तरीपण काँग्रेसच्या मनात संघाबद्दल आकस होताच. त्यातून संघ जे 'राष्ट्रधर्म' साप्ताहिक काढत होते, त्यावर बंदी घालण्यात आली. १९४७ पासून लखनौ इथून राष्ट्रधर्म काढण्यात येत होते. अटलबिहारी वाजपेयी, व राजीव लोचन अग्निहोत्री त्याचे संपादक होते. दीनदयाळ उपाध्याय बाकी व्यवस्था बघत असत. ज्या वेळी संघावर बंदी घातली गेली, तेव्हा त्या वेळी संघाचे काही नेते भूमिगत झाले व ते लपून छपून संघाचे कार्य पुढे चालवत होते.
नंतर नानाजींनी अलाहाबाद येथे जाऊन 'सेवाप्रेस' हे मुद्रणालय चालू केले. खरं तर मुद्रणालय चालवणे हे संपूर्णपणे वेगळे क्षेत्र होते. परंतु नानाजींनी त्याचा सखोल अभ्यास केला. अगदी बारीक सारीक, तपशीलवार अभ्यास केला. कुठलेही क्षेत्र असो, एकदा त्यातले काम किंवा जबाबदारी अंगावर घेतली की ती सक्षमपणे, पूर्ण अभ्यास करून पार पाडायची, हे नानाजींचे वैशिष्ट्य होते.
पुढे १९४७ ते १९५१ या काळात नानाजी 'राष्ट्रधर्म प्रकाशन' या संस्थेचे 'व्यवस्थापकीय संचालक' या पदावर नियुक्त झाले. प्रत्येक कामात नानाजींची कुशलता, सृजनशीलता दिसून येत असे. या काळात त्यांनी संघाच्या प्रार्थनेची माहिती सांगणारी सचित्र पुस्तिका प्रकाशित केली. 'पांचजन्य', 'स्वदेश', ही हिंदी आणि 'ऑर्गनायझर' हे इंग्रजी साप्ताहिक यांचे प्रकाशन नानाजींच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. यानंतर मात्र फक्त समाजकारण हे क्षेत्र न ठरवता संघाने राजकारणातही प्रवेश केला पाहिजे, असा विचार काही लोकांच्या मनात येऊ लागला. राजकारण समाजाच्या जडणघडणीवर प्रभाव टाकते. त्यासाठी ‘संघाची विचारधारा असणारा राजकीय पक्ष असावा’ असे मत बरेच संघ कार्यकर्ते व्यक्त करु लागले.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पहिल्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री होते. पंडित नेहरू पंतप्रधान, तर वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. १९४१४२ या वर्षात बंगाल प्रांतात स्थापन झालेल्या शासनात डॉ. श्यामाप्रसाद अर्थमंत्री होते. त्यांनी 'हिंदू महासभे'चे अध्यक्ष म्हणूनही काम केले. पुढे हिंदू महासभेशी पटले नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला. १९४६ साली जी 'संविधान समिती' स्थापन करण्यात आली, त्यात ते एक सदस्य होते. मंत्रिमंडळात सामील झाल्यावर भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये 'नेहरू लियाकत' करार झाला. यावेळी डॉ. मुखर्जी व पंडित नेहरू यांचे काही मुद्यांवर पटले नाही व डॉ. मुखर्जी यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. नंतर ते संघसंचालक गोळवलकर गुरुजी यांना भेटले. त्यांनी गुरुजींना नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी सहकार्य मागितले. तेव्हा गुरुजी म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नवीन पक्षात सामील होणार नाही, पण आमचे काही कार्यकर्ते मी तुम्हाला या कामासाठी देत.”
यानंतर गोळवलकर गुरुजींनी पंडित दीनदयाळ उपाध्याय व नानाजी देशमुख, माधवराव मोघे, सुंदरसिंह भंडारी, ठाकूरप्रसाद, भाई महावीर, यांच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या चमूत सहभागी व्हायला सांगितले. १९५१ च्या ऑक्टोबर महिन्यात 'भारतीय जनसंघ' या नवीन पक्षाची स्थापना झाली. या पक्षाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे सरचिटणीस होते व नानाजी उत्तर प्रदेशच्या क्षेत्रात संघटना बांधणीचे काम करत होते. नानाजींचे सगळ्या पक्षातील लोकांशी मैत्रीचे संबंध होते. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या विचारांनी नानाजी प्रभावित झाले आणि त्यांना भेटायचे असे नानाजींनी ठरवले. लखनौ मध्ये नानाजींनी लोहिया यांची भेट घेतली आणि लोहिया यांचे विचार जाणून घेण्याची इच्छा प्रगट केली. समाजवादी विचारसरणीच्या लोहियांना याचे खूप आश्चर्य वाटले. त्यावर नानाजींनी अतिशय मार्मिक उत्तर दिले,
“मी जनसंघाचा म्हणजेच संघाचा आहे आणि मरेपर्यंत संघाचाच राहीन, पण मी लोकशाही मानत असेन, तर तुमचे विचार जाणून घेण्याचा मला प्रयत्न केला पाहिजे”
कानपूर येथे जनसंघाच्या कार्यकर्त्यांचे पाच दिवसांचे शिबिर होते. त्यावेळी त्यांनी 'समाजवादी पक्षा'चे डॉ. राममनोहर लोहिया यांना भाषणासाठी बोलावले. डॉ. लोहिया संपूर्ण दिवस शिबिरात राहिले. भाषण देताना ते म्हणाले,
"तुम्ही सर्व संघाचे कार्यकर्ते मनातून 'समाजवादी' आहात. कारण तुम्ही सर्व एकाच प्रकारचे जेवण जेवता, आपले ताटवाटी स्वतः धुता, तुम्ही सर्वांना समान मानता, तुमच्यात श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव नाही, म्हणजे आपण एकच आहोत".
लोहिया व नानाजी यांची चांगली मैत्री कायम राहिली. लखनौला आल्यावर लोहिया नेहमी नानाजींकडे जेवायला जात असत.
१९५१ मधे विनोबा भावे यांनी 'भूदान चळवळ' सुरू केली. यात नानाजी सामील झाले. भूदान चळवळीचा उद्देश श्रीमंत, व भरपूर जमीन असणाऱ्या जमिनदारांकडून जमीन घ्यायची व ती भूमिहीन शेतकऱ्यांना वाटून द्यायची हा होता. नानाजींनी ही चळवळ उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश येथे राबविली.
१९५२ मधे पहिल्या सार्वत्रिक निवडणुका व्हायच्या होत्या. त्यावेळी नानाजींनी उत्तर प्रदेशात भारतीय जनसंघाच्या अनेक शाखा उभ्या केल्या. यासाठी त्यांना अतिशय मेहनत करावी लागली. माणसांची व निधीची जुळवाजुळव करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. १९५२ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात भारतीय जनसंघाचे तीन आमदार निवडून आले. १९५७ च्या निवडणुकी नंतर ही संख्या हळूहळू बदलत आणि वाढत गेली.
१९५१ ते १९६१ या दहा वर्षांच्या कालावधीत नानाजींची जबाबदारी वाढत होती. त्यांचे क्षेत्र उत्तर प्रदेशापुरते मर्यादित राहिले नव्हते. १९६२ मधे त्यांच्यावर अखिल भारतीय स्तरावरील जबाबदारी सोपवली गेली. नानाजींच्या योगदानामुळे थोड्याच वर्षात आर्थिक स्थैर्य मिळाले व त्याच बरोबर त्यांच्या पक्षाला 'प्रमुख विरोधी पक्ष' म्हणून स्थानही प्राप्त झाले. 'जनसंघ' हा एक महत्त्वाचा पक्ष म्हणून गणला जावू लागला. काही लोकांना हे डाचत होते. देशाच्या महत्त्वाच्या बाबींसंबंधी चर्चा होताना, निर्णय घेताना, जनसंघाची भूमिका विचारात घ्यायला सुरुवात झाली होती. या सर्व वाटचालीमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘विकास कसा करावा’ यावर मार्गदर्शन करत होते, तर नानाजी ‘पक्ष संघटना बळकट कशी होईल’ यावर जोर देत होते.
नानाजींचा लोकांवर किती प्रभाव होता, लोक त्यांचा किती आदर करीत होते यासंदर्भात एक घटना. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना १९६५ साली भारतपाकिस्तान युद्ध झाले. पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. शास्त्रीजींनी सैन्याचे मनोबल उंचावले होते. पण विरोधकांसह संपूर्ण देश शास्त्रीजींच्या पाठी खंबीरपणे उभा आहे, हे दाखविण्यासाठी एक प्रचंड मोठा मोर्चा दिल्लीत काढण्यात आला. यावेळी जवळपास एक लाख कार्यकर्ते दिल्लीत जमा झाले होते. यात विविध पक्षांचे लोक सामील झाले होते. संपूर्ण मोर्चा अत्यंत शांततेत, कोणतीही गडबड, गोंधळ न होता पार पडला. कुठे जरा गडबड वाटली की नानाजी आपले एक बोट उंचावून जमावाला शांत करीत होते. यावरून नानाजींचे लोकांच्या मनातील स्थान लक्षात येते. या मोर्चासाठी देशविदेशातील पत्रकार आले होते. अनेक वृत्तपत्रांनी मोर्चाचे सविस्तर वर्णन केले होते. एका वृत्तपत्राने त्याचे शीर्षक दिले होते 'वन फिंगर फॉर सायलेन्स'. याचे कारण, जरा गडबड गोंधळ झाला की नानाजी व्यासपीठावर जाऊन एक बोट उंचावत व लोक शांत होत. नानाजी होतेच तसे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केले होते. 'इदं न मम, राष्ट्राय स्वाहा' ही उक्ती इथे सार्थ ठरते.
१९६७ च्या निवडणुकीत राज्य स्तरावर विविध विरोधी पक्षांनी एकत्र येऊन 'संयुक्त विधायक दल' तयार केले. यात नानाजी यांचे मोठे योगदान होते. यात जनसंघ, समाजवादी पक्ष इत्यादी सामील होते. त्या वर्षी विधानसभा निवडणुकीत, काँग्रेस पक्षाने अनेक राज्यांमध्ये सत्ता गमावली. जवळपास दहा राज्यांमध्ये संयुक्त विधायक दलाची स्थापना झाली. उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, व बिहार येथे काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली. अर्थात यासाठी नानाजींनी निरनिराळ्या पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणण्याच्या कामात मोठी मदत केली. यातील काही सरकारे जास्त काळ टिकली नाहीत, परंतु काँग्रेसविरोधी मतांची एकजूट करणे, वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे, ही परंपरा सुरू झाली.
नियतीच्या मनात वेगळेच होते. १९६८ च्या फेब्रुवारी महिन्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा दिल्ली येथे जात असताना मुगलसराय या स्थानकाजवळ गूढरीत्या मृत्यू झाला. हा आघात फक्त त्यांच्या पक्षावर (जनसंघ) नव्हे, तर संपूर्ण भारताच्या राजकारणावर झाला होता. नानाजींसाठी तर हा धक्का पचविणे खूप कठीण होते, कारण त्या दोघांचा सहवास जवळपास तीस वर्षांचा होता. दोघांची विचारसरणी, ध्येय, प्रवृत्ती समान होती. त्यामुळे त्या दोघांच्यात सुंदर भावबंध निर्माण झाले होते. राजकारणातील ही रामलक्ष्मण यांची जोडीच होती.