"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"एकात्म मानवतावाद — विचारांतून परिवर्तनाकडे "
जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ग्रामीण विकासाची चळवळ!
"मी सत्तेपासून दूर राहून सर्जनशील कार्यात स्वतःला अर्पण करणार आहे." - मी माझ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीच्या अनुभवावरून निष्कर्ष काढला की, सत्तेच्या राजकारणातून ना विधायक नेतृत्व उदयास येऊ शकते, ना राष्ट्र उभे राहू शकते. म्हणून मी सत्ता, पक्ष आणि निवडणूक यांच्यापासून दूर राहून सामाजिक पुनर्रचनेसाठी कार्य करायचे ठरवले.
- नानाजी देशमुख
पद्मविभूषण, भारतरत्न नानाजी देशमुख ज्या क्षेत्रात प्रवेश करतील, जे काम हाती घेतील ते यशस्वी करतील, असे नानाजी. वेळप्रसंगी कठोर पण कधी मृदू असणारे नानाजी. आदिवासी व शेतकऱ्यांच्या घरी सुकी रोटी व चटणी खाऊन, खाटेवर किंवा खाली जमिनीवर सहजपणे झोपणारे नानाजी. आजारी नातेवाईकांची व स्नेह्यांची सेवा शुश्रुषा करणार नानाजी. लहान मुलांत रमणारे नानाजी. निवडणुकीच्या वेळी प्रभावी भाषण करणारे नानाजी. वंचित आदिवासी, व शेतकरी यांच्या सुखदु:खात सहभागी होणारे नानाजी. कुठल्याही विषयाचा सखोल अभ्यास करणारे नानाजी. तज्ज्ञांशी चर्चा, विचारविनिमय करून निर्णय घेणारे नानाजी. प्रतिष्ठित लोकांनासुध्दा जमिनीवर बसून पंगतीत जेवायला बसविणारे नानाजी. कुठल्याही राजकीय विचार असणाऱ्या नेत्याला आपलेसे करून घेणारे नानाजी. प्रत्येकाची आवड निवड आवर्जून लक्षात ठेवणारे नानाजी. भ्रष्टाचारी नेत्यांना वेळप्रसंगी खडसावणारे नानाजी. अनंत गुणांनी संपन्न असणारे नानाजी. किती लिहावे त्यांच्याबद्दल तेवढे थोडेच आहे. निधी संकलन व संघाचा विस्तार करताना अखंड प्रवास करणारे नानाजी. दरोडेखोरांच्या मनाचे परिवर्तन घडवून आणणारे नानाजी. कलाप्रेमी, व रसिक नानाजी. किती किती रुपे त्यांची.! जगातील किती लोकांना असे व्यक्तिमत्व लाभत असेल ?
त्यांच्यासाठी कोणतेही क्षेत्र वर्ज्य नव्हते. राजकारण, समाजकारण, स्थापत्य, आरोग्य, कृषी, वास्तुशास्त्र, व्यवसाय, संघटन, बायकांचे म्हणून समजले जाणारे विणकाम, अशा अनेक क्षेत्रात त्यांना गती होती. एवढे असूनही ते क्रिडा क्षेत्रात सुध्दा कुशल होते. खोखो, फुटबॉल हे त्यांचे आवडीचे खेळ. समर्थ रामदास 'दासबोधा'त जी महंतांची लक्षणे सांगतात, ती सर्व लक्षणे नानाजींच्या ठिकाणी होती. उत्तम वक्ता, संघटन कौशल्य, इतरांचे मन जाणून घेणे, लोकांना अडीअडचणीला मदत करणे, गोड बोलून इतरांची मने राखणे, हे महंतांना आवश्यक असणारे सगळे गुण त्यांच्याकडे होते. 'भगवदगीते'त वर्णन केलेल्या कर्मयोग्याप्रमाणे त्यांचे आयुष्य होते. निष्काम भावनेने, कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता समाजासाठी, समाजातल्या आपल्या दु:खी कष्टी बांधवांसाठी त्यांनी अविरत कष्ट केले.
एवढेच नाही तर योग्य वेळी राजकारणातून निवृत्त होऊन त्यांनी समाजासाठी काही करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. मंत्रीपद मिळत असताना ते नाकारुन त्यांनी समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले. एक उत्तम नीतिपाठ इतरांसाठी घालून दिला.
नानाजींचा जन्म ११ ऑक्टोबर १९१६ रोजी मराठवाड्यातील, हिंगोली जिल्ह्यातील 'कडोळी' या खेडेगावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अमृतराव देशमुख तर आईचे नाव अन्नपूर्णा होते. तिला सर्वजण राजाबाई म्हणत. नानाजींचे नाव चंडिकादास. पाच भावंडात ते सर्वात लहान. मोठा भाऊ आबाजी, त्यानंतर लक्ष्मीबाई, मैनाबाई व सखुबाई अशा तीन बहिणी. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यात घरी येणाऱ्या पाहुण्यांचा राबता. दोन वेळचे पुरेसे अन्न मिळणे कठीण होते. तिथे अतिथींचा पाहुणचार कसा काय करणार? नानाजींची आई बाळबोध घराण्यात वाढलेली. अतिथीला चांगले खाऊपिऊ घातले पाहिजे असे तिला वाटत असे. पण घरच्या परिस्थितीमुळे ते शक्य नव्हते. नानाजी अगदी लहान म्हणजे एकदीड वर्षांचे असताना त्यांनी विहिरीत उडी घेतली व आत्महत्या केली. त्यानंतर वडीलही वारले. घरची सर्व जबाबदारी आबाजींवर पडली.
नानाजींच्या तिन्ही बहिणींची लग्ने त्या वेळच्या प्रथेप्रमाणे लवकरच झाली होती. मोठी बहीण लक्ष्मीबाई. त्यांचे लग्न रिसोडमधल्या दत्तात्रय देशपांडे यांच्याशी झाले होते. दत्तात्रय देशपांडे प्राथमिक शाळेत शिक्षक होते. दुसरी बहिण मैनाबाई. तिचा विवाह नांदेड येथील बाऱ्हाळे वकिलांशी झाला होता. धाकटी बहीण सखुबाई. तिला बायडाबाई असे सुध्दा म्हणत. तिचा विवाह नांदेड जिल्ह्यातील 'जुन्नी' या गावातील एका शेतकऱ्याशी झाला होता. त्यांची जुन्नी गावाजवळ शेती होती. दिवसभर यजमान शेतावर जात म्हणून लहान नानाजींना बायडाबाईची सोबत होईल, या विचाराने जुन्नीला आणले. बायडाबाई व नानाजी यांच्या वयात फार अंतर नव्हते. त्यामुळे त्या दोघांचे चांगले पटत असे. दोघांचा वेळ खेळण्यात व घरकाम करण्यात जायचा.
जुन्नीला शाळा नव्हती म्हणून नानाजी वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शाळेत जाऊ शकले नाहीत. आईवडिलांचे प्रेमळ छत्र लहानपणीच नाहीसे झालेले. पुढे भावंडांनी त्यांना वाढवले पण आईचे प्रेम त्यांना कधीच मिळाले नाही.
१९२७ मधे मोठी बहिण लक्ष्मीबाई यांच्या यजमानांची, दत्तात्रय देशपांडे यांची बदली चिंचआंबा येथून रिसोड (जिल्हा अकोला) येथे झाली. मग लक्ष्मीबाईंनी नानाजींना आपल्या घरी आणले. दत्तात्रय देशपांडे यांनी नानाला एकदम तिसरीच्या वर्गात घातले. वयाच्या नवव्या वर्षी नानाजींना मुळाक्षरे देखील लिहिता येत नव्हती. पहिल्या दोन वर्षांचा अभ्यास त्यांनी नानाजींकडून घरीच करुन घेतला. नानाजी अतिशय हुशार व कुशाग्र बुध्दीचे होते. त्यांनी हा अभ्यास सहज आत्मसात केला, एवढेच नाही तर पुढे तिसऱ्या इयत्तेपासून आठव्या इयत्तेपर्यंत त्यांनी पहिला नंबर कधीच सोडला नाही. रिसोड हे तालुक्याचे गाव. रिसोडची शाळा आठवी पर्यंत होती म्हणून पुढच्या शिक्षणासाठी नानाजींना जिल्ह्याच्या गावी, वाशीम इथे येथे मामाच्या घरी जावे लागले. वाशीम येथील सरकारी शाळेत नानाजींचा दाखला घेण्यात आला.
मामा म्हणजे भगवंतराव देशपांडे. वाशीमला नानाजींच्या भावाचे (आबाजींचे) एक मित्र रहात होते. त्यांचे नाव भाऊ पाठक. या पाठकांचा धाकटा भाऊ 'आबा' हा नानाजींच्या वयाचा होता म्हणून त्या दोघांची घट्ट मैत्री झाली. पाठकांच्या कुटुंबात नाना अगदी मिसळून गेले. त्यांच्यातलेच एक सदस्य झाले. पाठक घराण्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती. घरातले लोक प्रेमळ, आपुलकीने वागणारे होते. म्हणून नानाजी आणि पाठक कुटुंबीय यांच्यात प्रेमाचे नाते निर्माण झाले. ते नातं किंवा भावबंध शेवटपर्यंत कायम राहिले.
पडेल ते काम करायचे ही नानाजींची वृत्ती. पाठकांची केळीची बाग होती. नानाजी व आबा यांनी केळीच्या बागेत काम करायला सुरुवात केली. याच बरोबर ते बाहेरून फळे व भाज्या आणायला लागले. गावातील सधन लोकांकडे फळे व भाज्या पोहोचवायचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, स्वयंसिद्ध होण्यासाठी हे पहिले पाऊल होते. आबा व नानाजी यांच्याबरोबर बाबाजी सोनटक्के आणि बाजीराव देशमुख हे त्यांचे दोन मित्र पण या व्यवसायात सहभागी झाले होते.
नानाजी अभ्यासाबरोबरच अभिनय, चित्रकला व वक्तृत्व अशा विविध कलांमध्ये पारंगत होते. या सर्वांचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात झाला.
पाठक कुटुंबात तिघे भाऊ. ते तिघे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'चे स्वयंसेवक होते. त्यामुळे नानाजी पण संघात जावू लागले. खरं तर यापूर्वीच रिसोड गावात मोठ्या बहिणीकडे रहात असताना त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी परिचय झाला होता. आता हा संघ संपर्क अधिकच दृढ झाला. त्यांनी १९२८ मध्ये वयाच्या १२ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. पाठक बंधू व मामा यांच्याकडून नानाजींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकडू मिळाले. त्या संस्कारांचा नानाजींवर मोठा प्रभाव होता. याच सुमारास म्हणजे १९३५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार वाशीमला संघाच्या विस्तार कार्यासाठी आले होते. डॉ. हेडगेवार यांच्या उपस्थितीत वाशीमच्या सतरा स्वयंसेवकांनी संघाचे कार्य आजन्म करण्याची प्रतिज्ञा केली. नानाजी या सतरा स्वयंसेवकांपैकी एक, सर्वात लहान स्वयंसेवक होते.
१९३० पासून भारतामध्ये परकीय ब्रिटिश सत्तेविरुद्ध प्रचंड आंदोलने झाली. काँग्रेसचे पुढारी महात्मा गांधी होते. ते सत्याग्रह, उपोषण आणि अहिंसा यांचे प्रवर्तक होते. मिठाचा सत्याग्रह, सविनय कायदेभंग अशी अनोखी हत्यारे त्यांनी इंग्रज राजवटी विरुद्ध उपसली होती. अनेक क्रांतिकारक ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे ब्रिटिश सत्तेविरुद्ध दंड ठोकून उभे होते. अशावेळी डॉ. हेडगेवार विचार करीत होते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते कसे टिकवून ठेवता येईल? यासाठी समाजातील निरनिराळ्या स्तरातील लोकांचे संघटन करायला हवे आणि मग याच विचारमंथनातून संघाची स्थापना झाली. नानाजींसारख्या अनेक निस्पृह, नि:स्वार्थी तरुणांनी संघकार्य हेच आपल्या आयुष्याचे ध्येय ठेवले व ते संघ कार्यासाठी आपल्या आयुष्याचे समर्पण करुन उभे राहिले.
अभ्यास आणि इतर कलागुण आत्मसात करत, १९३७ मधे, वयाच्या २१ व्या वर्षी वाशीम येथून नानाजी मॅट्रिकची परिक्षा उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाले.